Galle Test: पहिल्या कसोटीत भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, मानव सुथारचा ‘घातक षटकार’

गॉल येथे खेळल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण श्रीलंका विरुद्ध भारत कसोटी सामन्याचा निकाल पाचव्या दिवशी म्हणजे, बुधवारी (19 ऑगस्ट) लागला. यामध्ये भारताने श्रीलंकेचा 165 धावांनी मोठा पराभव केला. भारताच्या या उल्लेखनीय विजयामध्ये युवा फिरकीपटू मानव सुथारची कामगिरी चमकदार ठरली. त्याने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात तब्बल 6 विकेट्स घेतल्या.

मानवने श्रीलंकेच्या दुसऱ्या डावातील 76 व्या षटकांत तीन विकेट्स घेत, यजमानांना एकामागोमाग धक्का दिला. त्याच्या या विलक्षण कामगिरीमुळे भारताचा विजय सोपा झाला. तसेच त्याने शेवटची विकेटही घेतली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या विजयामुळे भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

सामन्याची स्थिती
या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने देवदत्त पडिक्कलच्या 167 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 462 धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावसंख्येवर आटोपला. यामध्ये भारतीय फिरकीपटूंनी यजमान संघाच्या फलंदाजांना अधिक काळ खेळपट्टीवर टिकूच दिले नाही. सुथार, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या तिकडीने आठ विकेट्स घेतल्या.

(बातमी अपडेट होत आहे.)

Comments are closed.