'धनुष्य आणि बाण' चिन्ह आणि पक्ष गोठवा!

कपिल सिब्बल यांची पर्यायी मागणी : देवदत्त कामत यांचाही ठाकरे गटासाठी युक्तिवाद

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

‘एकनाथ शिंदे यांना बेकायदेशीर पद्धतीने मूळ शिवसेना पक्ष आणि त्या पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण देण्यात आले आहे. आमच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे गटाचा या दोन्हींवर अधिकार आहे. तथापि, हे चिन्ह आणि नाव ठाकरे गटाला मिळणार नसेल, तर मूळ शिवसेना पक्ष आणि त्याचे चिन्ह गोठविले जावे,’ अशी पर्यायी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

बुधवारी कपिल सिब्बल यांनीच त्यांचा युक्तिवाद पुढे चालविला. त्यांच्यानंतर ठाकरे गटाचे आणखी एक वकील देवदत्त कामत यांनीही युक्तिवाद केला. शिंदे यांचा पक्षच बेकायदेशीर आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बेकायदेशीर पद्धतीने पक्ष आणि नाव शिंदे यांना दिले आहे. शिंदे यांच्यासह जे आमदार अपात्र ठरावयास हवे होते, ते मूळ पक्ष बळकावून बसले आहेत. या पक्षावर आणि चिन्हावर ठाकरे यांच्या गटाचा अधिकार आहे. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यात राजकीय पक्ष हाच श्रेष्ठ असतो. विधिमंडळ पक्षाला स्वत:ला मूळ पक्ष म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मूळ चिन्ह आणि मूळ पक्ष ठाकरे यांनाच मिळणे आवश्यक आहे. तथापि, कोणत्याही कारणास्तव ते मिळणार नसेल, तर पक्ष आणि चिन्ह गोठवले जावे. ते शिंदे यांच्याकडे ठेवले जाऊ नये, असा सिब्बल यांचा युक्तिवाद आहे.

शिंदे यांनी घेतला फायदा

शिवसेना हे मूळ नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मूळ शिवसेना पक्षाचे आहे. घटनाबाह्या पद्धतीने या दोन्ही बाबी शिंदे यांना देण्यात आल्या आहेत. शिंदे यांना निवडणुकांमध्ये या नावाचा आणि चिन्हाचा लाभ मिळाला आहे. तो यापुढे त्यांना मिळता कामा नये. तसे झाल्यास ते लोकशाहीच्या तत्वानुसार नसेल. अशा स्थितीत आमचा युक्तिवाद मान्य करून सर्वोच्च न्यायालयाने योग्य तो निर्णय द्यावा, अशा अर्थाचे आवाहनही कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादाच्या शेवटी केले आहे.

त्यावेळच्या स्थितीचा विचार व्हावा

जुलै 2022 मध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तिचा आज विचार करताना त्यावेळची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला जनतेने स्वीकारले आहे आणि खरा शिवसेना पक्ष कोणता, हे जनतेनेच निर्धारीत केले आहे, असा युक्तिवाद शिंदे यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. तो मान्य झाला, तर पक्षांतराला प्रोत्साहन दिल्यासारखे होईल, अशीही मांडणी सिब्बल आणि कामत यांनी केली. दोन्ही वकिलांनी जवळपास समान मुद्द्यांवरच युक्तिवाद केला आहे.

आजही चालणार युक्तिवाद

उद्धव ठाकरे गटाच्या बाजूकडून बुधवारी युक्तिवाद संपविला जाईल, अशी शक्यता होती. तथापि, हा युक्तिवाद आज गुरुवारीही चालणार आहे. गुरुवारी दुपारी चार वाजता तो संपण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे ठाकरे गटाचा युक्तिवाद सलग नऊ दिवस होईल. त्यानंतर कदाचित पुढच्या मंगळवारपासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वतीने युक्तिवाद केला जाईल. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्यासाठी अन्य ज्येष्ठ वकील युक्तिवाद करतील. त्यांच्या बाजूचा युक्तिवादही किमान एक सप्ताह चालण्याची शक्यता आहे.

निर्णयासंबंधी उत्सुकता

महाराष्ट्राच्या 2022 मधील राजकीय पेचप्रसंगासंबंधी सुनावणी आता अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणता निर्णय देणार, यासंबंधी उत्सुकता आहे. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे संबंध आणि पक्षांतरबंदी कायदा हे दोन सर्वात महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत.

युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे

ड शिंदे यांच्या बाजूने लागलेले आयोग आणि अध्यक्षांचे निर्णय बेकायदेशीर

ड राजकीय पक्ष हाच विधिमंडळ पक्षापेक्षा श्रेष्ठ, विधिमंडळ पक्ष केवळ शाखा

ड उद्धव ठाकरे गटाचाच मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर अधिकार

Comments are closed.