‘प्लास्टिक रिसायक्लोथॉन’ उपक्रमाला पुरस्कार
मुंबईच्या ‘प्लास्टिक रिसायक्लोथॉन’ या उपक्रमाला ‘चेष्ठा कोचर नज पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले. ‘प्लास्टिक रिसायक्लोथॉन’ या उपक्रमाच्या पर्यावरणविषयक योगदानाची दखल घेत संस्थेने त्यांना दहा लाख रुपयांचे पारितोषिक देऊन पुरस्कृत केले. ‘इंडियन स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी’ आणि ‘चेष्ठा कोचर फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
‘प्लास्टिक रिसायक्लोथॉन’ उपक्रमामध्ये स्वयंसेवक जवळच्या संकलन केंद्रातून कचरा विनामूल्य गोळा करतात. त्यावर पुनर्प्रक्रिया करून बाकडी, पेन्सिल बॉक्स, कचरापेट्या आणि इतर उपयुक्त वस्तू तयार केल्या जातात. यावेळी नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अशोक लाहिरी, लष्कराचे माजी प्रमुख आणि सेशेल्समधील भारताचे माजी उच्चायुक्त जनरल दलबीर सिंग सुहाग, जिंदाल इन्स्टिट्यूट ऑफ बिहेवियरल सायन्सेसचे डीन प्रा. डॉ. पुलकित खन्ना यांच्यासह ‘इंडियन स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी’चे अध्यक्ष आणि सहसंस्थापक लुईस मिरांडा, ‘सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे महासंचालक लेफ्टनंट जनरल डॉ. एस. पी. कोचर व शिशिर जोशी आदी उपस्थित होते.
Comments are closed.