“कसोटीमध्ये विराट कोहली सचिन तेंडुलकरपेक्षा सरस…”, दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा (15,921) आणि सर्वाधिक शतक (51) हे दोन्ही विक्रम भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकरच्याच नावावर आहेत. तरीही विराट कोहली कसोटीमध्ये सचिनपेक्षा सरस असल्याचे वक्तव्य दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटूने केले आहे.

एबी डिव्हिलिअर्सच्या मते, सचिन तेंडुलकरने विदेशात एक चांगला फलंदाज म्हणून आपली छाप सोडली, पण विराट कोहलीने ते पुढच्या स्तरावर नेले. त्याने विराटला विदेशातील सर्वोत्तम फलंदाज म्हणताना सचिनपेक्षा सरस म्हटले आहे. विराटने मागच्याच वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो भारतासाठी केवळ वनडे प्रकारचे सामने खेळतो.

“मला खूप पूर्वीच्या सचिन तेंडुलकरची आठवण येते, ज्याने भारतासाठी हा ट्रेंड सुरू केला. तरीही, तो विराट कोहलीसारखा मजबूत नव्हता, जो त्याच्यापेक्षाही सरस होता. पण सचिन हा पहिला खेळाडू होता ज्याने दाखवून दिले की उपखंडातील फलंदाज म्हणून तुम्ही उसळत्या आणि सीमिंग खेळपट्टीवर चांगली कामगिरी करू शकता. विराटने तेच पुढे नेले आणि एक नवा मापदंड प्रस्थापित केला,” असे डिव्हिलियर्सने त्याच्या युट्यूब चॅनेलवर म्हटले आहे.

टेस्टमध्ये बेस्ट कोण? आकडेवारीवरून जाणा…
सचिन 2013 मध्ये कसोटीमध्ये 200 सामन्यांमध्ये 51 शतकांच्या सहाय्याने 15,921 धावा अशा उल्लेखनीय कामगिरीनंतर निवृत्त झाला. विराटने मे 2025 मध्ये कसोटीमधून निवृत्ती घेतली. त्याने 123 कसोटी सामन्यांमध्ये 9230 धावा केल्या. तो कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 19 व्या स्थानावर आहे.

विदेशी खेळपट्टीवरील कसोटी सामन्यांमधील दोन्ही फलंदाजांची आकडेवारी पाहिली, तर त्यामध्ये पुन्हा एकदा सचिनच आघाडीवर आहे. त्याने 8705 धावा भारताबाहेर केल्या आहेत, जे त्याच्या एकूण धावसंख्येच्या जवळपास 55% आहेत.

दुसरीकडे विराटने भारताबाहेर 66 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 4774 धावा केल्या. त्याची ही कामगिरी SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांपुरती मर्यादित ठेवली, तरी सचिनच वरचढ ठरतो. तसेच सचिन विदेशीतील कसोटी सामन्यांच्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील आहे. (“Virat Kohli is superior to Sachin Tendulkar in Test cricket” ab de villiers sensational claim)

कोहलीच्या कार्यकाळात भारताने कसोटीमध्ये विदेशी भूमीवर स्वत:ला मजबूत संघ सिद्ध केले, त्यामुळे बाहेरील मैदानावर संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा वाढली आहे. हाच प्रभाव सध्याच्या पिढीमध्ये दिसून येत आहे, असे मत डिव्हिलिअर्सने मांडले आहे.

“देवदत्त पडिक्कल आणि केएल राहुल यांची तो ट्रेंड फॉलो करायला सुरूवात केली आहे. ते सचिन आणि विराटच्या पावलावर पाऊल ठेवत आहे”, असे डिव्हिलिअर्सने म्हटले आहे.

Comments are closed.