Earwax Removal: कानात साचलेला मळ काढण्याची सोपी पद्धत
कानात चिकट मळ दिसला की अनेकांना तो लगेच काढून टाकावासा वाटतो. त्यासाठी कॉटन बड, पिन, हेअरपिन किंवा इतर टोकदार वस्तू वापरण्याची सवयही काही जणांना असते. पण कानातला मळ म्हणजे घाण नाही आणि तो पूर्णपणे काढून टाकणंही नेहमी गरजेचं नसतं. इअरवॅक्स कानाच्या आतील त्वचेचं संरक्षण करण्यास आणि धूळ-कचरा अडकवण्यास मदत करतो. मग नेमका चिकट मळ कसा स्वच्छ करायचा याच्या काही सोप्या स्टेप्स जाणून घेऊयात.
कान स्वच्छ करण्याची सुरक्षित पद्धत
पायरी 1:
कानाच्या बाहेरील भागावर साचलेला मळ मऊ, स्वच्छ कापडाने हलक्या हाताने पुसा.
पायरी २:
कानात मळ साचल्यामुळे कान बंद झाल्यासारखा वाटत असेल, तर स्वतः काहीही टाकण्याऐवजी फार्मसीत मिळणारे इअरवॅक्स-सॉफ्टनिंग ड्रॉप्स डॉक्टर किंवा फार्मासिस्टच्या सल्ल्याने वापरा.
पायरी 3:
ड्रॉप्स वापरताना पॅकेटवरील किंवा डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करा. स्वतःहून जास्त प्रमाणात वापरू नका.
पायरी ४:
मळामुळे ऐकू कमी येत असेल किंवा कान पूर्णपणे बंद झाला असेल, तर ENT तज्ज्ञांकडे जा. गरज असल्यास डॉक्टर सुरक्षित पद्धतीने मळ काढतील.
या चुका अजिबात करू नका
कानात कॉटन बड, मॅचस्टिक, पिन, हेअरपिन किंवा इतर टोकदार वस्तू घालू नका. यामुळे मळ आणखी आत जाऊ शकतो किंवा कानाच्या पडद्याला दुखापत होऊ शकते.
कान दुखत असेल, कानातून पाणी/पू येत असेल, रक्त येत असेल किंवा अचानक ऐकू कमी येत असेल तर घरच्या घरी प्रयोग न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. कान स्वच्छ ठेवण्याचा सर्वात सुरक्षित नियम म्हणजे बाहेरचा भाग स्वच्छ करा, पण कानाच्या आत काहीही घालू नका.
Comments are closed.