“जडेजा-सुथारची तुलना करणे चुकीचं, संघ अशाप्रकारे तयार नाही…”, माजी क्रिकेटपटू संतापले

गॉल कसोटीमध्ये भारतीय फिरकीपटूंनी यजमान संघाला चांगलाच त्रास दिला आणि मालिकेत संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 165 धावांनी विजय मिळवला, ज्यामध्ये 24 वर्षीय मानव सुथारने 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यानंतर त्याला रवींद्र जडेजाचा उत्तराधिकारी म्हटले जाऊ लागले, हे एका माजी क्रिकेटपटूला पटले नाही आणि त्याने व्हिडिओमार्फत आपला संताप व्यक्त केला.
माजी क्रिकेटपटू मनविंदर बिस्ला याने गुरूवारी (20 ऑगस्ट) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये त्याने म्हटले, “पहिल्या कसोटीत 10 विकेट्स घेतल्यानंतर मानव सुथार रवींद्र जडेजाची जागा घेणार का? अशी टीम बनत नाही. माझ्या मते हे पूर्णपणे चुकीचं आहे. रवींद्र जडेजा आमचा महान खेळाडू आहे. एक-दोन सामन्यांनंतर खेळाडू बदलण्याची आपल्याला/ लोकांना सवय आहे; अशा प्रकारे संघ बनत नाही.”
“कसोटीमध्ये रवींद्र जडेजाने 350 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 4000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. अशा खेळाडूंची जागा कोण घेऊ शकेल का? हो, त्यांच्यासोबत राहून तुम्ही तुमच्या कामगिरीत सुधारणा करू शकता. मानव सुथारला तेच करावे लागेल. त्याला त्याचे स्थान मिळवावे लागेल. दोन्ही खेळाडू भारतासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांच्याकडे बदली खेळाडू म्हणून पाहू नका,” असेही बिस्लाने पुढे म्हटले आहे.
मानवने जून 2026 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. मुल्लाणपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात तो सामनावीर ठरला होता. त्याने त्यावेळी पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात एक विकेट घेण्याची कामगिरी केली होती.
तसेच 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या जडेजाने आतापर्यंत 90 कसोटी सामने खेळले आहेत, तर गॉल कसोटी ही मानवच्या कारकिर्दीतील दुसरीच कसोटी होती. जडेजाने त्याच्या कसोटीच्या 169 डावांमध्ये 352 विकेट्स घेतल्या आणि 4117 धावा केल्या आहेत.
बिस्लाने स्थानिक क्रिकेटमध्ये हरयाणाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग राहिला आहे. त्याने 2012 च्या अंतिम सामन्यात 89 धावा करत केकेआरच्या विजेतेपदामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली होती. (Manav Suthar ravindra jadeja Replacement debate leaves Manvinder Bisla Furious)
Comments are closed.