…म्हणून ‘स्पिरीट’ चित्रपटामधून दीपिका पदुकोणला मिळाला डच्चू, खरे कारण आलं समोर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रभास आणि संदीप रेड्डी वांगा यांच्या बहुप्रतिक्षित ‘स्पिरिट’ चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पदुकोण बाहेर पडल्यापासून या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. दीपिकाला चित्रपटातून का वगळण्यात आले, याबाबत आतापर्यंत अनेक कारणे समोर आली होती. मात्र, आता दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचे भाऊ आणि चित्रपटाशी संबंधित प्रणय रेड्डी वांगा यांनी यामागचे वेगळेच कारण सांगितल्याचा दावा केला आहे.

टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार प्रणय रेड्डी वांगा यांच्या म्हणण्यानुसार, दीपिकाने चित्रपटाच्या नफ्यात 10 टक्के वाटा मागितला होता. या मागणीमुळे निर्मिती टीम आणि अभिनेत्री यांच्यातील चर्चा पुढे होऊ शकली नाही आणि अखेर दीपिकाऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीचा पर्याय निवडण्यात आला. दीपिकाला चित्रपटातून वगळण्यामागे केवळ मानधनाचा मुद्दा नव्हता, असे प्रणय यांनी सांगितले. दीपिका नुकतीच आई झाल्यामुळे ती कामासाठी मर्यादित वेळ देणार असल्याच्या बातम्याही यापूर्वी समोर आल्या होत्या.

प्रणय यांनी एका मुलाखतीत सांगितल्याचा दावा आहे की, संदीप रेड्डी वांगा जवळपास दीड वर्षांपासून दीपिकाच्या संपर्कात होते आणि त्यांना तिला ‘स्पिरिट’मध्ये कास्ट करायचे होते. मात्र, चर्चेदरम्यान मानधन आणि इतर आर्थिक अटींबाबत अपेक्षा वाढत गेल्या. प्रणय यांच्या दाव्यानुसार, दीपिकाने चित्रपटाच्या नफ्यात 10 टक्के हिस्सा मागितला होता. त्यांच्या मते, अभिनेत्रीला कोणतीही मागणी करण्याचा अधिकार आहे; मात्र निर्मात्यांच्या दृष्टीने चित्रपटाचे बजेट आणि आर्थिक गणित महत्त्वाचे होते. ही मागणी टीमला योग्य वाटली नाही आणि त्यामुळे त्यांनी अन्य पर्यायांचा विचार सुरू केला.

प्रणय यांनी आणखी एक गंभीर दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दीपिकाच्या भूमिकेबाबत आणि चित्रपटाच्या कथेबाबत टीममध्ये बराच काळ चर्चा सुरू होती. मात्र, दुसऱ्या पर्यायाचा विचार सुरू झाल्यानंतर चित्रपटाशी संबंधित काही माहिती बाहेर येऊ लागली. दरम्यान, दीपिकाला चित्रपटातून वगळण्यामागे यापूर्वी 8 तासांच्या शूटिंग शिफ्टची मागणी, मानधन आणि इतर अटी कारणीभूत असल्याचे वृत्त होते. आता प्रणय रेड्डी वांगांच्या या नव्या दाव्यामुळे ‘स्पिरिट’मधून दीपिकाला बाहेर करण्यामागील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. प्रणय रेड्डी वांगांनी केलेले हे दावे असून, यावर दीपिका पदुकोणकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Comments are closed.