भरधाव कारने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू; खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल.
हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पुन्हा एकदा भरधाव कारचा कहर दिसून आला आहे. तेथे एका भरधाव एस्टन मार्टिन कारची धडक बसल्यामुळे एका 26 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. संबंधित कार राज्यसभा खासदार लिंगामनेनी रमेश यांचा पुत्र लिंगामनेनी संजुश (21 वर्षे) चालवत होता. पोलिसांनी त्याच्या विरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. तर पीडित महिला भारती मुखी ही एका स्टोअरमध्ये सेल्सवुमन म्हणून काम करत होती. भारती ही स्वत:ची सहकर्मचारी पूजा सोबत लंचसाठी बाहेर गेली होती. तेथून परततेवेळी रस्ता ओलांडत असताना कारने भारतीला धडक दिली होती. कार अत्यंत वेगाने अन् निष्काळजीपणे चालविली जात होती. या दुर्घटनेत भारतीच्या डोक्याला गंभीर ईजा होत रक्तस्राव सुरू झाला होता, त्याच कारने तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले, जेथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. कारचालक संजुशचे पिता जनसेवा पक्षाचे राज्यसभा खासदार आहेत. दुर्घटनेप्रकरणी आरोपीला नोटीस बजावण्यात आली आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही, कारण गुन्हा जामिनपात्र असून कमाल शिक्षा 7 वर्षांपेक्षा कमी असल्याचे पोलीस अधिकारी सी. श्रीधर यांनी सांगितले आहे.
Comments are closed.