धावत्या पीएमपी बसमधून पडली अन् मागून येणाऱ्या स्कूल बसखाली सापडली, पुण्यात 25 वर्षीय विद्यार्थिनीचा करूण अंत
पुण्यातील सिंहगड रोडवर भीषण अपघात झाला आहे. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पीएमपी बसच्या पुढच्या दरवाजातून खाली पडून एका 25 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. बसमधून खाली पडल्यानंतर ही तरुणी शेजारून जाणाऱ्या एका स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने तिचा करूण अंत झाला. कांचन बलवंत खड्डा (वय – 25, रा. कृष्णा हॉस्टेल, डीआयएटी कॅम्पस, गिरीनगर, खडकवासला) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेलच्या समोर, स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. कांचन ही खडकवासला येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी होती. ती पीएमपी बसने प्रवास करत असताना अचानक पाय घसरून पुढच्या दरवाजातून थेट रस्त्यावर कोसळली. त्याच क्षणी बाजूने जाणाऱ्या स्कूल बसचे चाक तिच्या अंगावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. माणिकबाग भागात झालेल्या या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ तिला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील पीएमपी बस आणि स्कूल बस या दोन्ही वाहनांच्या चालकांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पुढील तपास तर आहेत.
“विद्यार्थिनी बसमधून खाली नेमकी कशी पडली, दरवाजा उघडा होता का, तसेच दोन्ही वाहनांची वेगाची स्थिती काय होती याचा सखोल तपास केला जात आहे. घटनेचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू असून चालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे,” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
Comments are closed.