IND vs SL: शतकी खेळी करूनही जुरेलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद! सचिन-लक्ष्मण यांच्या या यादीत समावेश

श्रीलंकाविरुद्ध खेळल्या जात (India vs Srilanka) असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ध्रुव जुरेलने (Dhruv Jurel) शानदार शतकी खेळी केली. तो शेवटपर्यंत नाबाद राहत तंबूत परतला. एकही श्रीलंकाई गोलंदाज त्याला बाद करू शकला नाही. जुरेलने भारतासाठी कसोटीतील आपले दुसरे शतक झळकावले. मात्र, शतकी खेळी करूनही त्याचे नाव एका नकोशा विक्रमात नोंदवले गेले आहे.

2007 पासून आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 99 वरून 100 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात जास्त चेंडू खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये जुरेल तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या सामन्यात 99 वरून 100 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याने 13 चेंडू खेळले.

या यादीत पहिला नंबर आर. अश्विनचा आहे. त्याने 2016 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 99 वरून 100 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी 15 चेंडू खेळले होते. या यादीत दुसरे नाव मुरली विजयचे यांचे आहे. त्यांनी 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे 14 चेंडू खेळले होते. चौथ्या क्रमांकावर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आहेत. त्यांनी 2008 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध दिल्लीत 12 चेंडूंचा सामना केला होता, तर सचिन तेंडुलकर यांनी 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीत 99 वरून शतक पूर्ण करण्यासाठी 12 चेंडूंचा सामना केला होता. आता जुरेलचे नावही या यादीत समाविष्ट झाले आहे.

7 नंबरवर फलंदाजी करताना जुरेलने श्रीलंकाई गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने संयम राखून फलंदाजी केली. जुरेलने 177 चेंडूत नाबाद 115 धावांची खेळी केली. त्याने 9 चौकार आणि 2 षटकार ठोकले. जुरेलशिवाय देवदत्त पडिक्कलनेही (Devdatta paddikal) शतक झळकावले. त्याने 193 चेंडूत 117 धावांची खेळी केली. याशिवाय, शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनीही अर्धशतके झळकावली. गिलने 108 चेंडूत 50 तर पंतने 89 चेंडूत 63 धावा केल्या. भारताने दुसऱ्या दिवशी 9 गडी बाद 503 धावांवर डाव घोषित केला, ज्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने 3 षटकांत 8 धावा करत आपले 2 फलंदाज गमावले आहेत.

2007 नंतर कसोटी सामन्यांत कोणत्याही भारतीय फलंदाजाने 99 वरून 100 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी सामना केलेले सर्वाधिक चेंडू!

  • 15 चेंडू – रविचंद्रन अश्विन विरुद्ध वेस्ट इंडिज (ग्रॉस आयलेट, 2016)
  • 14 चेंडू – मुरली विजय विरुद्ध इंग्लंड (ट्रेंट ब्रिज, 2014)
  • 13 चेंडू – ध्रुव जुरेल विरुद्ध श्रीलंका (कोलंबो एसएससी, 2026)
  • 12 चेंडू – व्ही. व्ही. एस. लक्ष्मण विरुद्ध ऑस्ट्रेलिया (दिल्ली, 2008)
  • 12 चेंडू – सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया (नागपूर, 2008)

Comments are closed.