हवाई दल देखील 'आत्मनिर्भर' (आत्मनिर्भर) नारा स्वीकारते.
नेहमी लागणारे 97 टक्के भाग देशातच बनविणार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वायुदलाने आता मोठ्या प्रमाणावर ‘आत्मनिर्भरते’चा मार्ग अनुसरल्याचे दिसून येत आहे. वायुदलाला नेहमी ज्या सुट्या भागांची आवश्यकता असते, त्यांच्यापैकी 97 टक्के सुटे भाग देशातच निर्माण केले जाणार आहेत. या स्वदेशी बनावटीच्या भागांचीच खरेदी केली जाणार असून आयातीवरचे अवलंबित्व कमीतकमी ठेवण्याचे धोरण आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर विदेशी चलनाची बचत होणार असून विदेशांवरील अवलंबित्वही कमी होऊन देशात संरक्षण तंत्रज्ञान विकासाला अधिक चालना मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे.
विमानांच्या आणि विमानसंबंधी यंत्रणांचे बव्हंशी सुटे भागच नव्हे, तर युद्ध विमानांवर बसविण्यात येणारी क्षेपणास्त्रेही यापुढे बव्हंशी भारत निर्मितच असतील. भारतीय वायुदलाला साधारणत: आवश्यक असणाऱ्या सुट्या भागांपैकी जवळपास 62 हजार 300 सुट्या भागांची निर्मिती आता देशातच केली जात आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये 582 कोटी रुपये वाचले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये वायुदलाने या सुट्या भागांच्या खरेदीत भारत निर्मित भाग खरेदी करण्याचे 90 टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. आता 97 टक्के भाग भारतातच निर्माण झाले आहेत.
तंत्रज्ञान विकास, खासगी भागीदारी
केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी संरक्षण सामग्री क्षेत्र खासगी क्षेत्रासाठीही मोकळे केले आहे. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात खासगी क्षेत्रातील कंपन्या आणि स्टार्टअप्स यांच्याकडून संरक्षण सामग्रीची निर्मिती देशातच केली जात आहे. संरक्षण साधनांच्या तंत्रज्ञान विकासालाही मोठ्या प्रमाणात चालना गेल्या 12 वर्षांमध्ये देण्यात आली आहे. केवळ नेहमीच्या सुट्या भागांची नव्हे, तर जे सुटे भाग अनिवार्यपणे आवश्यक आहेत, त्यांच्यापैकी 93 टक्के भागही भारतातच बनतात.
अत्याधुनिक भागांचीही निर्मिती
गेल्या चार वर्षांमध्ये भारताने 76 प्रकारांची ‘एस्केप एअर एक्स्प्लोसीव्ह’ विकसीत केली आहेत. त्यांची गुणवत्ता विदेशी उत्पादनांपेक्षाही अधिक असल्याचे दिसून आले आहे. युद्धविमान काही कारणांमुळे अपघातग्रस्त झाल्यास वैमानिकाचा जीव वाचविण्यासाठी ही साधने उपयोगास येतात. त्याचप्रमाणे 207 प्रकारांचे पॉवर कार्टस आणि 8 प्रकारांची वैमानिक पॅरॅशूटस्ही भारतातच बनविली जात आहेत. एस यु-30 विमानांच्या मेन्टेनन्ससाठी आवश्यक असणारी हैड्रोलिक बूस्टर पंप यंत्रणाही आता भारतातच स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण होत आहेत. संरक्षण साधनांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारी 3 डी प्रिंटिंग यंत्रणाही कार्यरत झाल्याने विदेशी सुट्या भागांवरचे भारताचे अवलंबित्वही बरेच कमी झाले आहे.
क्षेपणास्त्रांचेही स्वदेशीकरण
विमान यंत्रणांसाठी लागणाऱ्या सुट्या भागांप्रमाणे शत्रूवर हल्ला करण्यासाठी आवश्यक असणारी शस्त्रे, स्फोटके आणि क्षेपणास्त्रे यांची निर्मितीही आता भारतात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केली जात आहे. ‘आकाश’ क्षेपणास्त्र यंत्रणा आणि ‘समर’ क्षेपणास्त्र यंत्रणा विकसीत करण्यात आल्या आहेत. ही क्षेपणास्त्रे वायुदलाच्या युद्ध विमानांवर बसविण्यात आलेली आहेत. ही क्षेपणास्त्रे विमानांवरुन सोडण्याची यंत्रणाही आता देशातच संशोधनाच्या माध्यमातून विकसीत करण्यात आली आहेत.
स्वदेशीकरणाचा आग्रह…
देशाची संरक्षण व्यवस्था अधिकाधिक प्रमाणात विदेशी तंत्रज्ञान आणि विदेशी साधनांवर अवलंबून असल्यास काय होते, ते भारताला रशिया-युव्रेन युद्धावरुन समजले आहे. या युद्धामुळे भारताला रशियाकडून मिळणारी अनेक साधने खोळांबली आहेत. यात युद्ध विमानांसाठी आवश्यक असणाऱ्या एअरो इंजिन्सचाही समावेश आहे. त्यामुळे शक्य तितकी साधने भारतातच निर्माण करणे शक्य झाल्यास भारताला जेव्हा आवश्यकता आहे, तेव्हा ती उपलब्ध होऊ शकतात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास
ड गेल्या 12 वर्षांमध्ये भारतात संरक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान विकास
ड सहस्रावधी प्रकारांच्या सुट्या भागांचे आता भारतातच केले जाते उत्पादन
ड संरक्षण क्षेत्रात जास्तीत जास्त आत्मनिर्भरता आणण्यासाठी देश प्रयत्नशील
Comments are closed.