मोफत बस प्रवास, दरवर्षी 3 मोफत सिलिंडर.
तामिळनाडूत महिलांना रक्षाबंधनापूर्वी मोठी भेट : ट्रान्सजेंडरनाही मोफत बस प्रवासाची सुविधा
तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सोमवारी महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेचा विस्तार करण्याची घोषणा केली. तसेच लाभार्थींसाठी डिलक्स अन् एक्स्प्रेस यासारख्या सेवाही मोफत केल्या आहेत. विधानसभेत अनेक घोषणा करत विजय यांनी टीव्हीकेच्या मुख्य आश्वासनांची पूर्तता केली आहे. दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची अन् परंदूर ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली आहे. परंदूर विमानतळाला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता.
वृत्तसंस्था/ चेन्नई
महिलांसाठी मोफत बस प्रवास ‘वेत्री पयनम“चा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा किंवा प्रवास फेऱ्यांची संख्या अशी कुठलीच अट नसणार आहे. महिला महानगर आणि शहरी भागांमध्ये धावणाऱ्या एक्स्प्रेस, एलएसएस आणि डिलक्स सरकारी बसेसमध्येही मोफत प्रवास करू शकतील असे विजय यांनी स्पष्ट केले आहे.
कधीपासून सुरू होणार योजना?
ही योजना 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीवेळी सुरू केली जाणार आहे. या योजनेमुळे राज्य सरकारवर दरवर्षी 6 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे विजय यांनी सांगितले.
निवडणुकीपूर्वी आश्वासन
एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी विजय यांनी ‘अन्नपूर्णी सुपर सिक्स“ योजनेचे आश्वासन दिले होते. याच्या अंतर्गत तामिळनाडूच्या प्रत्येक पात्र परिवाराला दरवर्षी 6 मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या योजनेमुळे सिलिंडर खरेदी करण्यासाठीचा लोकांवरील भार कमी होणार आहे. सरकारने घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत स्वत: भरण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 3 मोफत एलपीजी सिलिंडर देण्यात येतील आणि सिलिंडरची किंमत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे विजय यांनी सांगितले. या घोषणेदरम्यान सत्तारुढ आमदारांनी बाक वाजवून त्याचे समर्थन पेले.
परंदूर विमानतळ प्रकल्प रद्द
राज्य सरकार परंदूरमध्ये नवे विमानतळ निर्माण करण्यासाठी उचलण्यात आलेली सर्व पावले रोखणार आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे कृषी भूमी प्रभावित होणे आणि शेतकरी तसेच स्थानिक रहिवाशांच्या उपजीविकेवर प्रभाव पडण्याची भीती आहे. चेन्नईतील मीनांबक्कम विमानतळाची वार्षिक सुमारे 3 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. शहराच्या वाढत्या गरजा, औद्योगिक विकास आणि मालवाहतुकीतील वृद्धी पाहता नव्या विमानतळाची आवश्यकता आहे, परंतु यासाठी कृषी भूमी आणि नागरी भागांवर किमान प्रभाव पडेल अशा ठिकाणाची निवड केली जावी असे वक्तव्य मुख्यमंत्री विजय यांनी केले आहे.
केंद्राकडून मिळाली होती मंजुरी
परंदूर या कांचीपुरम जिल्ह्यातील ठिकाणी आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळ निर्माण करण्याच्या प्रस्तावाला एप्रिल 2025 मध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून तात्विक मंजुरी मिळाली होती. आता तामिळनाडू सरकारच्या या निर्णयामुळे प्रकल्पावरून पुढील दिशा बदलली आहे.
आर्थिक विकासासाठी आवश्यक
राज्याच्या आर्थिक विकासासाठी विमानतळ अत्यंत आवश्यक आहे आणि चेन्नईत एका नव्या विमानतळाची आवश्यकता आहे. चेन्नई विमानतळ कधीकाळी प्रवाशांच्या संख्येप्रकरणी तिसऱ्या क्रमांकावर होते, परंतु आता पाचव्या स्थानावर पोहोचले आहे. चेन्नई अन् तामिळनाडूत नव्या ग्रीनफील्ड विमानतळाची आवश्यकता पाहता परंदूरला यासाठी निवडण्यात आले होते असा दावा तामिळनाडूचे माजी मंत्री आणि द्रमुक नेते थंगम थेन्नारसु यांनी केला आहे.
किती लोकांना लाभ?
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 2.5 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेले परिवार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवार आणि छोट्या तसेच मध्यम शेतकरी परिवार, दिव्यांगांना लाभ होणार आहे. योजनेच्या तयारीचे काम सुरु झाले आहे. ही योजना 2027 च्या पोंगल सणावेळी (जानेवारी) सुरू केली जाणार आहे. राज्य सरकार या योजनेसाठी दरवर्षी 4 हजार कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचेही विजय यांनी सांगितले. 1.30 कोटीहून अधिक पात्र परिवारांना थेट लाभ हस्तांतरण व्यवस्थेद्वारे लाभ मिळणार आहे.
Comments are closed.