कृष्णभक्ती गीत गोविंदकर 'कविराज जयदेव' यांचा अभिनव संगीतमय आविष्कार
संस्कृत साहित्याच्या सुवर्णकाळाचा अस्त होत असताना आपल्या प्रतिभेने त्याला नवे तेज देणारे मनस्वी कृष्णभक्त कवी म्हणजे गीतगोविंदकार जयदेव. त्यांच्या जीवनावर आणि कृष्णभक्तीने ओथंबलेल्या काव्यनिर्मितीवर आधारित अभिनव हिंदी संगीताविष्कार लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.
प्रसिद्ध कवी सदानंद डबीर यांच्या मूळ मराठी काव्याचे प्रदीप ओक यांनी मराठी नाट्यरूपांतर केले आहे. ही सुंदर नाट्यकृती अधिकाधिक लोकांपर्यंत जावी म्हणून संजय पंडित यांनी तिचा हिंदी भावानुवाद केला आहे. जयदेव यांच्या जीवनातील अनेक विलक्षण पैलू या कार्यक्रमातून उलगडणार आहेत.
‘गीतगोविंद’च्या माध्यमातून संस्कृत साहित्यात अद्वितीय योगदान देणाऱ्या या प्रतिभावंत कवीचा जीवनप्रवास संगीत, काव्य आणि भक्ती यांच्या त्रिवेणी संगमातून सादर केला जाणार आहे.
हा अभिनव संगीताविष्कार, ‘संस्कार भारती’ आणि ‘१४ विद्या ६४ कला’ यांच्या सहयोगाने शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.०० वाजता विलेपार्ले येथील सावरकर केंद्र सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून जयदेवांच्या भक्तिरसपूर्ण जीवनकथेचा आणि साहित्यवैभवाचा अनुभव घेण्यासाठी रसिकांनी जरूर उपस्थित राहावे, असे निमंत्रक संजय पेठे यांनी कळवले आहे.
Comments are closed.