दाक्षिणात्य चित्रपटासाठी ‘समर्थ’ला चित्रपटगृह नाकारले
श्री समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण समाजासमोर आणणाऱ्या ‘समर्थ’ या मराठी चित्रपटाला एका दाक्षिणात्य चित्रपटासाठी चित्रपटगृह नाकारण्यात आले. यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
चित्रपटाचे निर्माते रवींद्र पाठक यांनी यासंदर्भात आपली कैफियत मांडली. १४ ऑगस्ट रोजी ‘समर्थ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुमारे दहा हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हा चित्रपट पाहिला. आणखीही काही शाळांमधील विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहण्याची तयारी दाखवली. त्याच वेळी एक दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला आणि ‘समर्थ’ या मराठी चित्रपटाला अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही चित्रपटगृह नाकारण्यात आले. दाक्षिणात्य चित्रपट जी कमाई आम्हाला मिळवून देणार आहे, ती कमाई आम्हाला समर्थ चित्रपट लावून मिळणार नाही; मग आमचे नुकसान कोण भरून देणार?” असे उर्मट उत्तर चित्रपटगृह चालकांकडून ऐकायला मिळत आहे.
या चित्रपटाला सर्व चित्रपट समीक्षकांनी दर्जेदार म्हणून गौरवले आहे. अशा परिस्थितीत जर मराठी चित्रपटाला चित्रपटगृहे नाकारली जात असतील, तर काय होणार? असा उद्विग्न सवालही ‘समर्थ’चे निर्माते रवींद्र पाठक यांनी केला आहे.
Comments are closed.