ठाणे महापालिकेचे ‘ऑपरेशन क्लीन’, कचऱ्याचे बेकायदा ९० स्पॉट हटवणार; पुन्हा कचरा साचू नये यासाठी ‘फिल्डिंग’
गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले असल्याने ठाणे पालिकेने ‘ऑपरेशन क्लीन’ मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सुमारे ९० ठिकाणी असलेले कचऱ्याचे बेकायदा स्पॉट कायमचे हटवण्याचे उद्दिष्ट घनकचरा विभागाने निश्चित केले आहे. केवळ कचरा उचलून जागा मोकळी न करता त्या ठिकाणी पुन्हा कचरा साचणार नाही यासाठी प्रशासन सफाई कर्मचाऱ्यांची ‘फिल्डिंग’ देखील लावणार आहे.
दोन वर्षांपूर्वी शहरातील ११५ बेकायदा कचरा स्पॉट बंद केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. मात्र कालांतराने यातील काही ठिकाणी पुन्हा कचरा साचू लागल्याने ‘बदलते ठाणे’ या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कचरा स्पॉट हटाव मोहीम पालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शहरातील ९० स्पॉटची पाहणी प्रशासनाने केली असून ते स्पॉट कायमस्वरूपी हटवण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे.
फुलांची सजावट करणार
कचरा हटवलेल्या जागेचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या स्पॉटवर फुलांच्या कुंड्या ठेवून परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. तसेच त्या जागेचा कचराकुंडी म्हणून वापर करू नये, अशा संदेशाचे फलक लावण्यात येणार आहेत.
दंडात्मक कारवाई
कचरा उचलल्यानंतर नागरिकांकडून पुन्हा त्याच जागी कचरा टाकला जात असल्याने आता त्या स्पॉ टवरच लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी एका अधिकाऱ्यासह पाच सफाई कामगारांचे पथक तैनात केले जाणार आहे. कचरा टाकण्याच्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच गंभीर प्रकरणात थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
हटवलेल्या कचऱ्याच्या स्पॉटवर पुन्हा कचरा दिसल्यास जबाबदारी निश्चित केलेल्या सॅनिटरी इन्स्पेक्टरला जाब विचारण्यात येणार आहे.
कचरा हटवल्यानंतर त्या जागेवर देखरेख ठेवणे, पुन्हा कचरा साचणार नाही याची खबरदारी घेण्याचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर असणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात झोपडपट्टीमध्ये कचरा संकल न प्रक्रिया सक्षम करून रस्त्यावर कचरा येणार नाही यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येणार आहे.
Comments are closed.