सामना प्रभाव! मुख्यमंत्र्यांनी बोलावली कॉरिडॉर बाधितांची बैठक, पर्यायी आराखड्याचा निश्चितपणे सकारात्मक विचार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या शिष्टमंडळाची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत बचाव समितीच्या वतीने कॉरिडॉरला ठाम पण संयमी स्वरात विरोध दर्शवत पर्यायी विकास आराखडा सादर केला. कॉरिडॉर करताना विश्वासात घेऊन करु असे आश्वासन शासनाने दिले होते, मात्र बाधितांना विश्वासात न घेताच कार्यवाही सुरु होती. ‘दैनिक सामना’ने यावर तिखट शब्दांत वृत्त प्रसिद्ध करताच शासनाने बाधितांना चर्चेसाठी बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

या बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, स्थानिक आमदार समाधान अवताडे, राज्याचे मुख्य सचिव अग्रवाल, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी देशमुख, शेळके व इथापे यांच्यासह महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला बचाव समितीच्या वतीने माननीय वीर महाराज यांनी 25 मिनिटे अत्यंत प्रभावी भाषण करत स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वारकऱ्यांच्या भावना तसेच अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. त्यांनी समितीच्या वतीने तयार केलेल्या पर्यायी आराखड्यातील महत्त्वाचे मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्ट केले. त्यानंतर अभय सिंह इसगावकर, डॉ. प्राजक्ता बेणारे, ह.भ.प. राठी महाराज, गणेश लंके, व्यंकटेश गलगलकर आणि ज्येष्ठ पत्रकार महेश खिस्ते यांनीही विविध विषयांवर भूमिका मांडत सरकारचे लक्ष वेधले.

शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीच्या मुद्द्यांचे स्वागत केले आणि भविष्यातही अशा उपयुक्त सूचना करण्याचे आवाहन केले.

महत्वाचे मुद्दे

  • तीर्थक्षेत्र बचाव समितीचे वतीने वारकरी पाईक संघ यांनी निर्माण केलेला तज्ञ इंजिनिअर श्री निलेश बडवे महाजन व मयूर पिंपळनेरकर यांनी अपारकाष्टातून साकारलेला पंढरपूर विकासाचा आगळावेगळा आराखडा सादर केला.
  • वर्षानुवर्षे सरकारच्या पडीक पडलेल्या जागांचा वापर करण्यात यावा खाजगी जागांवर नको.
  • पूरग्रस्त रेषेतून व स्मशानाच्या जवळून येणाऱ्या भावी दर्शन मंडपाच्या कामाला कडाडून विरोध करण्यात आला.
  • खादी ग्रामोद्योग व आसपासच्या मोकळ्या जागांवर मध्यवर्ती भाविक सुविधा केंद्राचा आवाढव्य प्रकल्प करण्यात यावा.
  • कॉरिडोर विरोधात सुमारे 3100 लोकांच्या हरकती असून त्यात कॉरिडॉरच्या बाजूने 50 सुद्धा लोक नाहीत, असेही यावेळी सांगण्यात आले.

Comments are closed.