पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दिल्लीतील दाम्पत्याला अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’शी संबंधित एका मोठ्या हेरगिरी नेटवर्कचा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाकिस्तानातील हस्तकांसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली साहिल (वय २५) आणि त्याची पत्नी समीरा (वय २१) या दिल्लीतील दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. हे दाम्पत्य २०२४ पासून देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोघांचे दिल्ली ते कराची आणि इस्लामाबादपर्यंतचे लागेबांधे उघडकीस आले असून, पाकिस्तानी हँडलर्स या दाम्पत्याला पैशांचे आमिष दाखवून काम करून घेत होते.

दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवली ८ हिंदुस्थानी सिमकार्ड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल आणि समीरा यांनी २०२४ ते २०२५ दरम्यान ८ भारतीय सिमकार्डे मिळवून ती दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवली होती. या सिमकार्ड्ससाठी त्यांना ३०,००० रुपये देण्यात आले होते. या क्रमांकांचा वापर पाकिस्तानात व्हॉट्सॲप अकाउंट्स सुरू करण्यासाठी केला गेला. तेथील गुप्तहेर या व्हॉट्सॲप खात्यांच्या माध्यमातून हिंदुस्थानातील लोकांशी संपर्क साधून गुप्त माहिती गोळा करत होते, तसेच हिंदुस्थानी व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये घुसखोरी करून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होते.

लष्करी भागांची रेकी आणि कोर्ट-मार्शलची माहिती लीक

साहिलकडे हिंदुस्थानातील विविध भागांतील छावण्यांची (कॅन्टोन्मेंट क्षेत्र) रेकी करण्याची आणि हेरगिरीसाठी नव्या लोकांची भरती करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. इतकेच नव्हे तर ट्रिब्युनलसमोर कोर्ट-मार्शल कारवाईला सामोरे जाणाऱ्या लष्करी जवानांची गोपनीय माहितीही त्याने हस्तकांना पुरवल्याचे तपासात समोर आले आहे. हिंदुस्थानी संरक्षण यंत्रणा आणि लष्करी हालचालींची माहिती मिळवण्याचा या नेटवर्कचा मुख्य हेतू होता.

इन्स्टाग्रामवरून जुळले हेरगिरीचे धागेदोरे

स्पेशल सेलने सर्वप्रथम साहिलला सराई काले खां परिसरातील चांद बीबी कॅम्पमधून ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीत पाकिस्तानी एजंट्ससोबतचे संभाषण उघड झाले. त्यानंतर या कटात सहभागी असलेली त्याची पत्नी समीरा हिलाही अटक करण्यात आली. २०२४ मध्ये समीराच्या मध्यस्थीनेच साहिलचा एका पाकिस्तानी एजंटशी इन्स्टाग्रामवर संपर्क आला होता. पुढे त्यांना पैशांचे आमिष दाखवून हेरगिरीच्या जाळ्यात ओढण्यात आले.

साहिलने इग्नू (IGNOU) मधून बीए केले असून तो पूर्वी वकिलाकडे काम करत होता. तर समीरा नोएडा येथील एका कॉल सेंटरमध्ये कार्यरत होती. या दोघांच्या अटकेमुळे पाकिस्तानातील गुप्तहेर संघटनांचे हिंदुस्थानातील स्लीपर सेल्स आणि स्थानिक हस्तकांबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

Comments are closed.