कैलास मानसरोवर यात्रेला गेलेली महिला नेपाळमधील महापुरात बेपत्ता; अंजली दमानिया यांचे मदतीसाठी आवाहन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरात कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेली महिला बेपत्ता झाल्याची बाब समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या शेजारी राहणाऱ्या प्रेरणा काळे या यात्रेत अडकल्या असून, त्यांच्याशी संपर्क तुटला आहे. या संदर्भात दमानिया यांनी X वर पोस्टद्वारे माहिती देत सरकार आणि जनतेकडे मदतीचे आवाहन केले आहे.

अंजली दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेरणा काळे यांच्याशी शेवटचा संपर्क २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता झाला होता. त्यावेळी त्या मानसरोवरच्या दिशेने मार्गक्रमण करत होत्या आणि २६ ऑगस्टच्या पहाटे त्या सीमा ओलांडणार होत्या. मात्र नेपाळमध्ये आलेल्या प्रलयंकारी महापुरानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. दमानिया आणि कुटुंबीयांनी सर्व सरकारी यंत्रणांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्याप त्यांच्याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही.

प्रेरणा काळे या नेपाळस्थित रिचा टूर्स या ट्रॅव्हल ग्रुपसोबत यात्रेला गेल्या आहेत. या टूरचे व्यवस्थापन मुंबईचे डॉ. मिलिंद चितळे करत असल्याची माहितीही दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.

नागरिकांना आवाहन करताना दमानिया यांनी एक पोस्टर शेअर केले असून, “हे पोस्टर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. या ग्रुपबद्दल किंवा प्रेरणा काळे यांच्याबद्दल कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीने दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा,” अशी विनंती त्यांनी केली आहे.

Comments are closed.