ऑफिसला जाणाऱ्यांनी सकाळच्या नाश्त्यात काय खावे?
सकाळची घाई, अलार्म बंद करून पुन्हा पाच मिनिटांची झोप, त्यामुळे झालेला उशीर, तयार होण्याची लगबग आणि त्यानंतर ट्रॅफिकमध्ये अडकण्याची चिंता या सगळ्यात सर्वात आधी दुर्लक्ष होते ते नाश्त्याकडे. अनेक जण घरातून फक्त चहा-बिस्किटे खाऊन किंवा कधी कधी रिकाम्या पोटीच ऑफिसला निघतात. पण सकाळचा नाश्ता म्हणजे केवळ पोट भरणे नाही, तर दिवसभराच्या कामासाठी शरीराला योग्य इंधन देणे आहे. breakfast ideas for office workers
नाश्ता कसा असावा?
ऑफिसला जाणाऱ्यांच्या नाश्त्यात प्रथिने, फायबर आणि पौष्टिक कार्बोहायड्रेट्स यांचा समतोल असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नाश्ता पोटभरीचा आणि शक्य तितका संतुलित ठेवणे फायदेशीर ठरते.
पोहे, उपमा किंवा थालीपीठ
नेहमीचा पोहा किंवा उपमा अधिक पौष्टिक करण्यासाठी त्यात भाज्या आणि शेंगदाणे घाला. थालीपीठासोबत दही घेतल्यास नाश्ता अधिक संतुलित होऊ शकतो. मूग डाळीचे चिल्ले, बेसन चिल्ला किंवा स्प्राउट्स चाट हेही झटपट पर्याय आहेत.
अंडी, पनीर आणि दही
नाश्त्यात प्रथिनांचा समावेश करण्यासाठी उकडलेले अंडे, भुर्जी, पनीर किंवा दही घेता येते. शाकाहारी व्यक्तींसाठी मूग, डाळी, पनीर आणि दही हे सोपे पर्याय आहेत.
फळे आणि सुका मेवा
घाईच्या सकाळी केळे, सफरचंद किंवा पेरूसोबत मूठभर बदाम, अक्रोड किंवा शेंगदाणे घेता येतात. मात्र फक्त फळे किंवा फक्त चहा यावर नाश्ता थांबवू नका.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाश्ता करण्यासाठी तासभर वेळ काढण्याची गरज नाही. रात्रीच काही तयारी करून ठेवली तर सकाळची घाई कमी होते. चहा-बिस्किटांवर दिवस ढकलण्यापेक्षा पाच-दहा मिनिटांत तयार होणारा संतुलित नाश्ता निवडा. तुमचा दिवसही अधिक व्यवस्थित सुरू होईल आणि सकाळची धावपळ थोडी कमी जाणवेल.
Comments are closed.