आयएसआयच्या गुप्तहेर जोडप्याला दिल्लीत अटक

पती-पत्नी करत होते रेकी : पाकिस्तानला पाठविली सिमकार्ड्स

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संबंधिक एका हेर नेटवर्कचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत मोहम्मद साहिल आणि समीरा अशी नावे असलेल्या दांपत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. साहिल आणि समीरा हे दोघेही 2024 पासून पाकिस्तानातील हँडलर्सच्या संपर्कात होते. आरोपींकडून दोन मोबाइल हस्तगत करण्यात आले असून त्यात आक्षेपार्ह चॅट आढळून आला आहे.

आरोपींनी 8 भारतीय सिमकार्ड्स पाकिस्तानात पाठविली होती. साहिल आणि समीरा हे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाकिस्तानी हँडलर्सच्या सातत्याने संपर्कात होते. या संपर्काचा वापर गोपनीय माहिती पुरविण्यासाठी केला जात होतो. दोघांनाही भारतीय कँटोन्मेंट भागांची रेकी करण्याची जबाबदारी आयएसआयने सोपविली होती. दिल्ली पोलीस आता या दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत. पोलीस या नेटवर्कशी निगडित अन्य लोकांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच पाकिस्तानी हँडलर्स अन् पुरविण्यात आलेल्या संवेदनशील माहितीचा तपशील मिळविला जात आहे.

2024 पासून संपर्कात

साहिल आणि समीरा हे पाकिस्तानी हँडलर्सच्या निर्देशावर काम करत होते. त्यांनी 2024 आणि 2025 मध्ये पाकिस्तानात पाठविलेल्या 8 सिमकार्ड्सचा वापर हेरगिरीसाठी झाल्याचा संशय आहे. याकरता पाकिस्तानी हँडलर्सनी दोघांना 30 हजार रुपये दिले होते. या सिमकार्ड्सच्या क्रमांकांवर पाकिस्तानात व्हॉट्सअॅप अकौंट अॅक्टिवेट करण्यात आले आणि पाकिस्तानचे हस्तक काही भारतीय व्हॉट्सअॅप ग्रूप्समध्ये सामील होण्यास यशस्वी ठरले.

छावणी क्षेत्रांची रेकी

साहिलला भारतात वेगवेगळ्या ठिकाणी कँटोन्मेंट भागांची रेकी करणे आणि कोर्ट मार्शलची कार्यवाही प्रलंबित असलेल्या जवानांची माहिती देण्याचे काम सोपविण्यात आले होते. साहिलच्या चौकशीनंतर त्याची पत्नी समीराला अटक करण्यात आली. आयएसआयला सिमकार्ड्स उपलब्ध करविण्यात तिची महत्त्वाची भूमिका होती. दोघांच्या मोबाइल फोनच्या फॉरेन्सिक विश्लेषणात पाकिस्तानी हँडलर्ससोबतचे व्हॉट्सअॅप चॅट समवेत अनेक आक्षेपार्ह संभाषणं मिळाली आहेत. दोघांच्या चौकशीत पाकिस्तानच्या गुप्त हस्तकांच्या काम करण्याच्या पद्धतीची माहिती कळली आहे. तसेच या मॉड्यूलची संरचना आणि कामकाजाविषयी महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली आहे.

Comments are closed.