'शुद्धीकरण'वर भाजपची जोरदार टीका

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

‘शुद्धीकरण’ प्रकरणावरुन भारतीय जनता पक्षाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तराखंड येथील एका कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर व्यासपीठाचे होम हवन करुन ‘शुद्धीकरण’ करण्यात आले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. हे कथित शुद्धीकरण करणारे लोक भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते, असेही काँग्रेस पक्षाचे म्हणणे आहे. तथापि, भारतीय जनता पक्षाने हे सर्व आरोप पूर्णत: फेटाळले असून निवडणुकांमध्ये यश मिळत नसल्याने निराश झालेल्या काँग्रेसने आता राजकीय स्वार्थासाठी हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोप केला आहे. शुद्धीकरणाची कोणतीही घटना घडलेली नाही. काँग्रेस खोटे आरोप करीत आहे, असे या पक्षाचे प्रतिपादन आहे.

काँग्रेसची सत्ता असताना दलितांवर अनेक अत्याचार झाले आहेत. अनेक दलितांचा मृत्यू अशा हिंसाचारात झाला आहे. तथापि, काँग्रेसने त्यावेळी दलित समाजासंबंधी कधीही सहानुभूती दाखविलेली नाही. पण आता राजकीय यश मिळत नसल्याने काँग्रेस समाज तोडफोड करुन आपले राजकीय अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. उत्तराखंडमध्ये जो प्रसंग घडला असा काँग्रेसचा आरोप आहे, त्या प्रसंगाचा कोणाच्याही किंवा कोणत्याही जातीशी संबंध नाही. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या व्यासपीठावर जातीलच कसे, असा प्रतिप्रश्नही भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला. काँग्रेसवरचा लोकांचा विश्वास घटल्याने तो आपले नैराश्य प्रकट करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.

Comments are closed.