उझबेकिस्तानसोबत युरेनियम पुरवठा करार
पंतप्रधानांच्या दौऱ्यात सहमती : उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान नरेंद्र मोदींना प्राप्त
वृत्तसंस्था/ ताश्कंद
विदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी ताश्कंदमध्ये उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक केली. या बैठकीत भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील युरेनियम पुरवठ्यावर सहमती करार झाल्यामुळे दोन्ही देशांमधील मजबूत सहकार्याचे संकेत मिळाले. याचदरम्यान, रविवारी उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना विविध देशांकडून मिळालेला हा 36 वा सर्वोच्च सन्मान आहे.
उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना रविवारी राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांच्या हस्ते त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान ‘ओली दराजाली दोस्लिक’ प्रदान करण्यात आला. भारताच्या इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेल्या पंतप्रधानांपैकी नरेंद्र मोदी एक आहेत. पुरस्कार प्रदान सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी ताश्कंदमध्ये दाखल झाल्यावर विमानतळावर त्यांना सर्वप्रथम मानवंदना देण्यात आली. त्यानंतर ते राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांच्यासोबत ते एकाच गाडीतून रवाना झाले. रविवारी सकाळी त्यांनी ताश्कंदमध्ये उझबेकिस्तान योग महासंघाने आयोजित केलेल्या योग सत्रात भाग घेतला.
राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांच्या आमंत्रणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. यादरम्यान झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे स्वागत केले. भारत व उझबेकिस्तानमधील अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. दोन्ही देशांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून दोन्ही बाजूंची शिष्टमंडळांमध्ये एकमत झाल्याचे द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. परस्पर सहकार्याच्या सर्व पैलूंना मार्गदर्शन करण्यासाठी परराष्ट्रमंत्री स्तरावर एक समन्वय परिषद स्थापन केली जाईल. दोन्ही देशांमधील संयुक्त आयोगाला सचिव स्तरावरून मंत्री स्तरावर उन्नत करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युरेनियमवर चर्चा
मोदी आणि शवकत यांनी ताश्कंदमध्ये द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत भारत आणि उझबेकिस्तानमधील युरेनियम पुरवठ्यावर चर्चा झाली. दोन्ही देशांनी 2030 पर्यंत वार्षिक द्विपक्षीय व्यापार 5 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या, दोन्ही देशांमधील व्यापार 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. बैठकीनंतर पंतप्रधानांनी माध्यमांशी संवाद साधला.
संरक्षण सहकार्यावरही एकमत
दोन्ही देश संरक्षण क्षेत्रात थेट सहकार्य, संयुक्तपणे शस्त्रनिर्मिती आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या शक्यता पडताळून पाहणार असल्याचेही पंतप्रधान मोदींनी जाहीर केले. दोन्ही देश दहशतवाद, अतिरेकीपणा आणि फुटीरतावाद यांना प्रदेशासाठी गंभीर धोका मानतात. या धोक्यांविरुद्ध शून्य-सहिष्णुता धोरण सुरू ठेवण्यास ते सहमत झाले. भारत-उझबेकिस्तान संबंधांचा भक्कम पाया सामायिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा यात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
आज किर्गिस्तान दौरा : एससीओ परिषदेत सहभाग
उझबेकिस्तान दौऱ्यानंतर, पंतप्रधान मोदी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे पोहोचतील. या भेटीत ते 26 व्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होतील. भारत 2017 पासून एससीओचा पूर्ण सदस्य आहे. या शिखर परिषदेत सुरक्षा, दहशतवाद, व्यापार, संपर्क व्यवस्था आणि आर्थिक सहकार्य यांसारख्या मुद्यांवर चर्चा होईल. या शिखर परिषदेदरम्यान, मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इतर देशांच्या नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे. या भेटीत मोदी बिश्केक येथे होणाऱ्या सहाव्या वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन समारंभालाही उपस्थित राहणार आहेत.
Comments are closed.