दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, 7 चेंडूंत 3 विकेट घेत बनली टी20मधील नंबर-1 गोलंदाज

यंदाच्या महिला आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि थायलंड यांच्यातील सामना भारतीय संघाची स्टार फिरकीपटू दीप्ती शर्मा हिच्यासाठी अत्यंत खास ठरला. तिच्या कारकिर्दीतील हा 150वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यादरम्यान तिने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. थायलंडची फिरकीपटू नट्टाया बूचाथम हिला मागे टाकत दीप्ती आता महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज बनली आहे. थायलंडविरुद्धच्या या सामन्यात दीप्तीने अवघ्या 7 चेंडूंमध्ये 3 बळी घेतले.

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत दीप्ती शर्मा अव्वल स्थानावर पोहोचली आहे. तिने 150 सामन्यांत 171 बळी घेतले आहेत. थायलंडची नट्टाया बूचाथम 109 सामन्यांत 170 बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. रवांडाची हेन्रिएट इशिम्वे 134 सामन्यांत 164 बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन 113 सामन्यांत 154 बळींसह चौथ्या स्थानावर आहे.

आशिया चषक सुरू होण्यापूर्वी, दीप्ती शर्मा आणि नट्टाया बूचाथम या दोघींच्याही नावावर 168 बळी होते. त्या संयुक्तपणे अव्वल स्थानावर होत्या. त्यानंतर, हाँगकाँगविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात बळी घेत बूचाथमने दीप्तीला मागे टाकले. भारताविराुद्धच्या सामन्यात आणखी एक बळी घेत तिने आपली एकूण बळींची संख्या 170 पर्यंत नेली.

मात्र, थायलंडविरुद्धच्या सामन्यात दीप्तीने शानदार गोलंदाजी करत 3 बळी घेतले आणि बूचाथमला मागे टाकले. या सामन्यात दीप्तीने केवळ 1.1 षटके टाकली. विशेष म्हणजे, एकही धाव न देता 3 बळी घेण्याची कामगिरी तिने करून दाखवली.

भारत आणि थायलंड यांच्यातील सामन्यात भारतीय संघाने 94 धावांनी मोठा विजय मिळवला. संघाने आशिया चषकातील आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 9 गडी गमावून 159 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून, थायलंडचा संघ 16.1 षटकांत अवघ्या 65 धावांत सर्वबाद झाला.

भारताकडून शेफाली वर्माने 36 चेंडूंत 64 धावांची शानदार खेळी केली. तिच्या या प्रभावी कामगिरीसाठी तिला ‘सामनावीर’ (Player of the Match) हा पुरस्कार देण्यात आला.

Comments are closed.