स्मृती मानधना मिताली राजच्या विश्वविक्रमापासून केवळ 113 धावा दूर! सुझी बेट्सला मागे टाकत ‘या’ यादीत काबीज केले दुसरे स्थान

दुबईमध्ये सुरू असलेल्या महिला आशिया कप 2026 मध्ये रविवारी (30 ऑगस्ट) भारताची सलामीवीर स्मृती मानधनाची कामगिरी थायलंडविरुद्ध निराशाजनक राहिली असली तरी तिने इतिहास रचला आहे. या सामन्यात भारताच्या स्टार खेळाडूने आपल्या पहिल्याच चौकारामध्ये आपल्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.
मंधाना या सामन्यात 10 चेंडूंत 19 धावा करत धावबाद झाली. त्याआधी तिने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवले. तिने ही कामगिरी करताना सुझी बेट्सला (10740 धाव) मागे टाकले.
आता स्मृतीच्या पुढे केवळ मिताली राज
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर भारताची माजी कर्णधार मिताली राज आहे. तिने 10868 धावा केल्या आहेत. यामुळे स्मृतीच्या पुढे आता केवळ मिताली आहे.
स्मृती या यादीत 10756 धावा करत दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये तिने 9 कसोटी सामन्यांमध्ये केलेल्या 788 धावा, 120 वनडे सामन्यांच्या 5411 धावा आणि 172 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 4557 धावांचा समावेश आहे.
महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
10867 – मिताली राज (भारत)
10756* – स्मृती मानधना (भारत)
10740 – सुझी बेट्स (न्यूझीलंड)
10276 – शार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड)
10007- स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज)
विजयासह भारत आशिया कपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर
या सामन्यात थायलंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. स्मृती बाद झाल्यानंतर भारताचा डाव शफाली वर्माने सांभाळला. तिने अर्धशतकी खेळी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. तिने 36 चेंडूंत 8 चौकार आणि षटकारांच्याने सहाय्याने 64 धावा केल्या. कारकिर्दीतील आपला पहिलाच टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या प्रतिका रावलने 22 धावा केल्या. तसेच क्रांती गौडने 15 धावा केल्या. त्यामुळे भारताने 20 षटकांत 9 विकेट्स गमावत 159 धावसंख्या उभारली.
लक्ष्याच्या पाठलाग करण्यास उतरलेल्या थायलंडचा भारतीय गोलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांच्या पहिल्या दोन विकेट्स 3.1 षटकांत 16 धावसंख्येवरच पडल्या. नंदनी शर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. श्रीचरणीने दोन आणि क्रांतीने एक विकेट घेतली. त्यामुळे थायलंडचा संपूर्ण संघ 16.1 षटकांत 65 धावसंख्येवरच गारद झाला.
यादरम्यान दीप्तीनेही दोन ऐतिहासिक पराक्रम केले. ती महिला टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स (171) खेळाडू ठरली. त्याचबरोबर ती भारताकडून टी 20 मध्ये एका सामन्यात सर्वात कमी धाव देत 3 विकेट्स घेणारी गोलंदाज ठरली.
T20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारतासाठी एकाच सामन्यात कमी धावा देत 3 विकेट्स घेणारे
3/0 – दीप्ती शर्मा विरुद्ध थायलंड, दुबई
3/3 – वॉशिंग्टन सुंदर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कॅरारा 2025
3/4 – दीपक चहर विरुद्ध वेस्ट इंडिज, प्रोव्हिडन्स 2019
3/4 – शिवम दुबे वि UAE, दुबई 2025
3/5 – रेणुका सिंग विरुद्ध श्रीलंका, सिल्हेट 2022
3/5 – रियान पराग विरुद्ध श्रीलंका, पल्लेकेले 2024
भारताने हा सामना 94 धावांनी जिंकत या स्पर्धेच्या गट अ च्या गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. (Smriti Mandhana is 113 runs away from Mithali Raj’s world record! She surpassed Suzie Bates to claim second spot on this list IND vs THA Asia Cup 2026)
Comments are closed.