अमेरिकेने महिनाभरानंतर पुन्हा इराणवर हल्ला केला

होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये सुपर टँकर सागरी सुरुंगावर आदळल्याने आगीचा भडका

वृत्तसंस्था/ तेहरान

अमेरिकेने जवळपास एका महिन्यानंतर इराणवर पुन्हा लष्करी कारवाई केली आहे. रविवारी, अमेरिकेच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट लाँचरना लक्ष्य केले. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, इराणी रिव्होल्यूशनरी गार्डचे जवान होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये रॉकेट आणि सागरी सुरुंग डागण्याची तयारी करत होते. इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात अनेक सैनिक आणि नागरिक ठार झाले. मात्र, नेमकी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

एकीकडे हल्लासत्र सुरू असतानाच होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एक सुपर टँकर दोन सागरी सुरुंगांवर आदळला. ‘इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’नुसार, धडक बसल्यानंतर टँकरला आग लागली आणि तो पूर्णपणे थांबला. इराणने जहाजाचे नाव किंवा कर्मचाऱ्यांची माहिती उघड केली नाही. हा टँकर एका अनधिकृत सागरी मार्गाने प्रवास करत होता, असे ‘आयआरजीसी’ने सांगितले. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आपल्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर जहाजांवरही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

जॉर्डनमधील अमेरिकी तळांवर इराणचा प्रतिहल्ला

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने जॉर्डनमधील दोन अमेरिकी हवाई तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs डागल्याचा दावा केला आहे. इराणी माध्यमांनुसार, या क्षेपणास्त्रांनी अमेरिकी हवाई तळाच्या तांत्रिक आणि देखभाल पायाभूत सुविधा तसेच लढाऊ विमानांच्या तैनाती क्षेत्रांना लक्ष्य केले होते. अल अरबियाच्या वृत्तानुसार, जॉर्डनच्या हवाई संरक्षण दलाने इराणी क्षेपणास्त्रs रोखली.

लारक बेट इराणचे प्रमुख बंदर अब्बासजवळ आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या अगदी मध्यभागी आहे. हा सागरी मार्ग जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण युद्धापूर्वी जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायूची वाहतूक या मार्गातून होत होती. इराण सध्या बेटाजवळून जाणाऱ्या टँकर्सची तपासणी करत आहे आणि सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी जहाजांकडून 20 लाख डॉलर्स किंवा अंदाजे 19 कोटी रुपयांपर्यंत शुल्क आकारत आहे.

अमेरिकी लष्कराने भूसुरुंग हटवले

गेल्या आठवड्यात, अमेरिकी सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरून भूसुरुंग हटवण्याचे काम पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीतील सर्व सुरुंग हटवून निक्रिय करण्यात आल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नवीन सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला किंवा बोटीला नष्ट केले जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीला ‘नवीन अमेरिकी भूभाग’ असे संबोधले आहे. 18 ऑगस्ट रोजी त्यांनी प्रथमच होर्मुझवर अमेरिकेचे नियंत्रण असल्याचे सांगितले. त्यानंतर, 23 ऑगस्ट रोजी, त्यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पुन्हा एक तशीच प्रतिमा शेअर करत होर्मुझला अमेरिकेचा भूभाग म्हणून दर्शवले होते.

Comments are closed.