तू मैदान सोडलंस, मैदानाने तुला नाही…!

>>जया शेट्टी

तारक गेला, ही बातमी कानावर पडताच माझ्या पायाखालची लाल माती उडाली. हा फिट माणूस आजाराशी लढला, संघर्ष केला, पण त्याची चढाई यशस्वी होऊ शकली नाही. पण त्याच्या आठवणींच्या क्षणांसाठी माझं मन पुन्हा एकदा प्रभादेवीच्या मैदानात जाऊन उभं राहिलं. डोळय़ांसमोर आजचा मॅट नव्हता, कॅमेरे नव्हते, प्रकाशझोत नव्हते. दिसत होतं ते मातीचं मैदान… आजूबाजूला उभे असलेले प्रेक्षक… आणि रेषा ओलांडून चपळ पावलांनी पुढे जाणारा तारक. आम्ही त्याला कित्येक वर्षे तसेच पाहिलं. खेळताना, चढाया करताना, पकडीत झोपून देताना आणि मैदानाबाहेरही कबड्डीच जगताना. म्हणून तारकच्या जाण्याचं दुःख केवळ एका चांगल्या कबड्डीपटूच्या निधनाचं नाही, मी एक जिव्हाळय़ाचा मित्र गमावल्याचं आहे.

तारकची चढाई विलक्षण होती. ती फक्त पल्लेदार नव्हती, तिच्यामागे डोकं होतं. समोरचा बचावपटू काय करतोय, त्याची पुढची हालचाल काय असेल, कुठे फट आहे आणि परतताना स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं, याचा तो क्षणात अंदाज घ्यायचा. त्याच्या पायात एक वेगळीच लय होती. आम्ही त्याच्यासोबत खेळलो असल्यामुळे त्याची ती चढाई किती वेगळी होती, हे जवळून पाहिलं आहे. पण तारक फक्त रेडर नव्हता. मध्यरक्षकांना मदत करण्यापासून सर्व प्रकारच्या पकडींमध्ये सहभागी होण्यापर्यंत तो संघासाठी खेळायचा. स्वतःची चमक दाखवण्यापेक्षा संघाचा खेळ चांगला व्हावा, ही त्याची वृत्ती होती.

रिझर्व्ह बँकेच्या संघातून त्याने आपली छाप निर्माण केली आणि उत्पृष्ट खेळाच्या जोरावर त्याला महिंद्रा संघात संधी मिळाली. महिंद्राच्या संघातून त्याने दीर्घकाळ कबड्डी खेळली. प्रभादेवीच्या आल्हाद सेवा मंडळाकडून केसरीनाथ पवारांसोबत खेळतानाही त्याची वेगळी ओळख निर्माण झाली. त्या काळात कबड्डीभोवती आजच्यासारखा झगमगाट नव्हता, पण खेळाडूंच्या मनात खेळासाठी प्रचंड प्रेम होतं. तारक त्या प्रेमाचा खरा माणूस होता.

त्याच्या कर्तृत्वाची दखल घेत 1979-80 साली त्याला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला. 1981 च्या जपान सदिच्छा दौऱयावर गेलेल्या दोन हिंदुस्थानी पुरुष संघांपैकी एका संघाचं नेतृत्व करण्याचा मानही त्याला मिळाला. सलग पंचवीस वर्षे कबड्डीशी जोडलेला राहिल्याबद्दल शिवनेरी सेवा संघाने अध्यक्ष उदय लाड यांच्या हस्ते सोनसाखळी देऊन त्याचा केलेला सत्कार आजही आठवतो. पंचवीस वर्षे खेळणं म्हणजे फक्त मैदानावर टिकणं नाही, शरीर, मन आणि खेळाप्रती निष्ठा टिकवणं. तारकने हे तिन्ही जपलं.

तो निर्व्यसनी होता आणि फिटनेसवर त्याचं विशेष प्रेम होतं. शरीर तंदुरुस्त ठेवण्याची त्याची शिस्त त्याने शेवटपर्यंत सोडली नाही. म्हणूनच त्याच्या जाण्याची बातमी मनाला अधिक लागते. ज्याने आयुष्यभर शरीराला तंदुरुस्त ठेवलं, ज्याच्या पावलांना थांबणं माहीत नव्हतं, त्याची पावलं अखेर थांबली. पण तारकच्या शरीराचा प्रवास थांबला असला तरी त्याची खिलाडूवृत्ती थांबलेली नाही.

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावरही तारक कबड्डीपासून दूर गेला नाही. प्रशिक्षक म्हणून त्याने आपला अनुभव पुढच्या पिढीला दिला. कबड्डी हा फक्त ताकदीचा खेळ नाही, तर बुद्धी, तंत्र, संयम आणि संघभावनेचा खेळ आहे, हे त्याने शिकवलं. ‘पंगा’ चित्रपटासाठी कलाकारांना कबड्डीचं तांत्रिक प्रशिक्षण देतानाही त्याच्यातला कबड्डीपटू आणि प्रशिक्षक तितक्याच जिद्दीने काम करत होता.

माझ्यासाठी तारक फक्त सहकारी नव्हता. तो जवळचा मित्र होता. आमच्या कबड्डीच्या प्रवासात शेखर शेट्टी, रत्नाकर शेट्टी अशा अनेक मित्रांसोबत त्याने जी नाती जपली, ती आजच्या काळात दुर्मिळ वाटतात. मैदानावर स्पर्धा असायची, पण मैदानाबाहेर मनं जोडलेली असायची.

आज मागे वळून पाहतो तेव्हा एकच दृश्य वारंवार डोळय़ांसमोर येते, ती म्हणजे तारकची चढाई. मातीचं मैदान, समोर बचावफळी आणि ‘कबड्डी… कबड्डी…’ म्हणत पुढे जाणारा तारक. क्षणभरात तो फट शोधायचा, झेप घ्यायचा आणि पकडीतून निसटून परत यायचा. आज ती चढाई संपली आहे, पण माझ्या आठवणीत ती अजूनही सुरू आहे. तारक, तुझी पावलं थांबली असतील, पण तुझ्या चढाईची लय आम्ही कशी विसरणार?

तू मैदान सोडलंस, पण मैदानाने तुला अजून सोडलेलं नाही. तारकला मनापासून सलाम. भावपूर्ण श्रद्धांजली.

Comments are closed.