जितेंद्र मिश्रा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
देशसेवेनंतर आता रामभक्तांच्या सेवेत दाखल
वृत्तसंस्था/अयोध्या
भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम मंदिर ट्रस्टचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केल्यानंतर गुरुवारी त्यांनी पदभार स्वीकारला. जितेंद्र मिश्रा गुरुवारी पहिल्यांदाच अयोध्येत दाखल झाले. आपल्या नियुक्तीनंतर गुरुवारी ते अयोध्येत दाखल झाल्यानंतर ट्रस्टतर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र भवन येथे गेले. जितेंद्र मिश्रा यांनी आपल्या निवडीबद्दल ट्रस्टचे आभार मानले. त्यांनी आपल्या या निवडीला भगवान श्रीरामांची कृपा आणि आपल्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण अनुभव असे म्हटले. राष्ट्राची सेवा केल्यानंतर आता आपण रामभक्तांची सेवा करणार असल्याचेही मिश्रा यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांची ट्रस्टच्या अधिकाऱ्यांसोबत प्रशासकीय आणि आगामी कामांसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
सीईओ म्हणून अयोध्येच्या पहिल्या भेटीदरम्यान, एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र कार्यालयात एका महत्त्वाच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेत आगामी प्रशासकीय व विकास कामांविषयी माहिती घेतली. या बैठकीला ट्रस्टचे सरचिटणीस गोविंद देव गिरी महाराज, विश्वस्त जगदीश आफळे आणि खजिनदार महेश भागचंदका हेही उपस्थित होते. राम मंदिर ट्रस्टच्या इतिहासात प्रथमच एका माजी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यावर मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंदिर परिसराचा सतत होणारा विस्तार, वाढती पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली लक्षात घेता, एका कडक, अनुभवी आणि कार्यक्षम प्रशासकाची गरज बऱ्याच काळापासून भासत होती.
Comments are closed.