न्यूयॉर्कमध्ये विद्यार्थ्यांना ‘एआय’ वापरावर बंदी, महापौर झोहरान ममदानी यांची घोषणा
न्यूयॉर्क सिटी पब्लिक स्कूल्समध्ये विद्यार्थ्यांना एआय वापरावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. महापौर झोहरान ममदानी यांनी ही घोषणा केली. वर्गात एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत स्पष्ट नियम तयार करण्याच्या दिशेने हे अमेरिकेतील आतापर्यंतचे सर्वात कठोर पाऊल मानले जात आहे.
न्यूयॉर्कमधील सार्वजनिक शाळांमध्ये सध्या वापरली जाणारी 40 शैक्षणिक एआय साधने विद्यार्थ्यांसाठी थांबवली जाणार आहेत. या निर्णयाचा आठवी इयत्तेपर्यंतच्या जवळपास 6 लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होणार आहे. मात्र, ही बंदी सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे लागू असणार नाही. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना काही विशिष्ट परिस्थितींमध्ये एआय साधनांचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत संबंध निर्माण करणे, इतर विद्यार्थ्यांसोबत कौशल्ये विकसित करणे आणि कठीण प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. एआयवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहिल्यास विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचार करण्याच्या आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता या निर्णयामागे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षकांना परवानगी
विद्यार्थ्यांसाठी निर्बंध लागू करण्यात आले असले तरी शिक्षकांना एआय वापरण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आलेली नाही. धडे तयार करणे, नियोजन करणे, वेळापत्रक तयार करणे आणि प्रशासकीय स्वरूपाची कामे यांसाठी शिक्षकांना एआयचा वापर करता येणार आहे.
चॅटजीपीटीवरही घातली होती बंदी
न्यूयॉर्कच्या सार्वजनिक शाळांमध्ये एआय संदर्भातील निर्बंध नवीन नाहीत. 2022 मध्ये शाळांनी चॅटजीपीटी वापरावर तात्पुरती बंदी घातली होती. नंतर ही बंदी हटवण्यात आली आणि एआय तंत्रज्ञानाचा नियंत्रित शैक्षणिक वापर करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली.
Comments are closed.