सिक्कीममधील 40 हिमनदी तलावांचा धोका

16 ग्लेशियल सरोवरांवर सर्वाधिक जोखीम : 2023 सारख्या संकटाची भीती

न्यूजपेपर सोसायटी, गंगटोक

हिमालयीन राज्यांमध्ये ग्लेशियर वितळणे आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या सरोवरांनी धोक्याची घंटा वाजविली आहे. सिक्कीममध्ये हाय-हजार्ड म्हणजेच अत्याधिक धोका असलेल्या 40 ग्लेशियल सरोवरांची ओळख पटविण्यात आली आहे. यातील 16 सरोवरे सर्वाधिक जोखिमयुक्त श्रेणीत आहेत. यातील एखादे सरोवर अचानक फुटल्यास सखल भागांमध्ये वेगाने पाणी पोहोचून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.

40 हाय-हजार्ड ग्लेशियल सरोवरांपैकी 16 सरोवरांना कॅटेगरी ए म्हणजेच सर्वाधिक जोखिमयुक्त श्रेणीत ठेवण्यात आले आहे. दोन सरोवरे कॅटेगरी बी म्हणजेच हाय रिस्क आणि 9 सरोवरांना कॅटेगरी सी म्हणजेच मध्यम ते कमी जोखिमीच्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आले. 13 सरोवरांना अद्याप कुठल्याच श्रेणीत वर्ग करण्यात आलेले नाही.

ग्लेशियल सरोवरे हिमखंड वेगाने वितळल्यामुळे जमा झालेल्या पाण्यामुळे निर्माण होत असतात. पाण्याचे प्रमाण खूपच अधिक प्रमाणात वाढते किंवा भूकंपासारख्या कारणांमुळे नैसर्गिक भिंत तुटते तेव्हा ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड म्हणजेच जीएलओएफ संकट येऊ शकते.

हिमनदी तलाव उद्रेक पूर

-हिमालयीन क्षेत्रात ग्लेशियरच्या खालील हिस्स्यांमध्ये हिमखंड वितळून जमा झालेल्या पाण्यातून मोठा सरोवर निर्माण होतो.

-अत्याधिक प्रमाणामुळे कधीकधी पाण्याचा साठा पूराच्या स्वरुपात स्वत:च्या सीमा मोडून काढतो आणि यामुळे सखल भागात पूर येतो.

2023 मध्ये सिक्कीमध्ये काय घडले?

सिक्कीमने यापूर्वी अशाच आपत्तीचा सामना केला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये ग्लेशियल सरोवर फुटल्यानंतर आलेल्या पुरात कमीतकमी 60 जणांचा मृत्यू झाला होता. मंगन, गंगटोक, पाकयोंग आणि नामची जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले होते. या आपत्तीत एका मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण हिस्सा चुंगथांग धरणही नष्ट झाले होते. या घटनेने राज्यात ग्लेशियर सरोवरांशी निगडित धोक्यांवरून तयारी मजबूत करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

सरकारकडून उपाययोजना

सिक्कीममध्ये सरोवरांवर नजर ठेवण्यासाठी रिमोट सेंसिंग आणि उपग्रहीय छायाचित्रांचा वापर केला जात आहे. राज्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने फेब्रुवारी 2025 मध्ये जीएलओएफच्या धोक्याचे आकलन आणि त्यापासून बचावाच्या अध्ययनासाठी नोडल विभाग निर्माण केला होता. राज्य देशाचे पहिले समर्पित जीएलओएफ जोखिम न्यूनीकरण प्रोटोकॉल तयार करण्याच्या दिशेने देखील काम करत आहे. याच्या अंतर्गत पाण्याचा स्तर, पाण्याचा प्रवाह, सरोवराची खोली, भूगर्भीय स्थिती आणि पूराच्या संभाव्य मार्गांचे अध्ययन केले जातेय.

कोणत्या सरोवरांवर खास नजर?

-राज्याच्या अधिकाऱ्यांनुसार सर्व सरोवरांसाठी एकसारखी बचाव पद्धत लागू केली जाऊ शकत नाही.

-ल्होनाक कॉम्प्लेक्स, शाको छे सरोवर आणि गुरुडोंगमार कॉम्प्लेक्साठी वेगवेगळ्या योजना तयार.

-शाको छो सरोवराला सिक्कीम सरकारने जीएलओएफच्या दृष्ट्या सर्वात संवेदनशील मानले आहे.

-यासंबंधीचा विस्तृत अहवाल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला पाठविण्यात आला आहे.

-ल्होनाक कॉम्प्लेक्समध्ये पुराचे पाणी रोखण्यासाठी डोलमा सांपानजीक संरचनेच्या योजनेवर काम सुरू.

-गुरुडेंगमारमध्ये सरोवरातील पाणी बाहेर काढण्यासाठी मोरेन प्लग भिंत निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.

पाणी घटविणे, इशारा देण्याची तयारी

सरोवरांचे पाणी कमी करण्यासाठी सायफन, पंप, वर्तमान नाल्यांना सुधारणे, नवे  कृत्रिम मार्ग तयार करणे, सुरक्षा भिंती, भुयार तयार करण्यासारख्या पर्यायांवर विचार केला जातोय. अधिकाऱ्यांनी 4 टप्प्यांमध्ये तयारी असल्याचे सांगितले आहे. यात प्रारंभिक आकलन, विस्तृत आकलन, बचाव उपायांचे डिझाइना आणि त्यांची अंमलबजावणी सामील आहे. सिक्कीममध्ये अतिरिक्त अर्ली वॉर्निंग सेंसर लावण्याचा प्रस्ताव देखील आहे. केंद्राने हिमालयीन राज्यांच्या तयारींची समीक्षा केली असून यात सिक्कीमसोबत उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरचे अधिकारीही सामील झाले.

Comments are closed.