काल हल्ला करून 25 सैनिकांना ठार केले, आज व्हिडीओ प्रसिद्ध करत पुन्हा डिवचले; BLA चा पाकिस्तानला इशारा
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) मध्ये संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. बीएलएने केलेल्या दोन मोठ्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे 25 सैनिक ठार झाले. या भीषण हल्ल्यानंतर बीएलएने पाकिस्तानला डिवचत याचा व्हिडीओही शेअर केला. बीएलएने हक्कल अधिकृत मीडिया चॅनलवरून एका सिनेमाच्या शैलीत तयार केलेला थरारक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये सैन्याची जळणारी वाहने, स्फोट आणि रस्त्यावर पडलेले सैनिकांचे मृतदेह स्पष्ट दिसत आहेत.
शुक्रवारी झियारत क्रॉस येथे पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर बीएलएच्या फातेह स्क्वाडने अचानक हल्ला चढवला. या अंधाधुंद गोळीबार आणि स्फोटांमध्ये सैन्याची दोन वाहने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून 18 सैनिक जागीच ठार झाले, तर 5 जण गंभीर जखमी झाले. तर दुसऱ्या एका घटनेत, हजीका भागात बीएलएच्या एसटीओएस या युनिटने रिमोटने नियंत्रित केलेल्या आयईडी स्फोटाद्वारे लष्कराच्या गाडीला उडवले. यात 7 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला.
दरम्यान, बीएलएच्या हल्ल्यानंतर लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या सुरक्षेच्या दाव्यांचे धिंडवडे निघाले आहेत. पाकिस्तानी लष्कराने या घटनेवर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु सोशल मीडियावर पत्रकारांनी शेअर केलेल्या व्हिडिओंनुसार, मारल्या गेलेल्या सैनिकांचे मृतदेह रात्रीच्या अंधारात शांततेत त्यांच्या घरी पाठवले जात असल्याचे समोर आले आहे.

50 बंडखोरांना मारल्याचा दावे
दरम्यान, या भीषण हल्ल्यानंतर संतापलेल्या पाकिस्तानी लष्कराने मस्तुंग, सिबी, क्वेट्टा आणि कलात या भागात व्यापक सर्च ऑपरेशन आणि एअर स्ट्राईक सुरू केले आहेत. या कारवाईत बीएलए आणि टीटीपीच्या सुमारे 50 बंडखोरांना ठार केल्याचा दावा लष्कराने केला आहे.
Comments are closed.