VIDEO: भारतीय खेळाडूंचा मुक्काम ‘कंटेनरमध्ये’! जपानमधील Asian Games 2026 च्या मेडलसाठी अनोखी तयारी

जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 रंगणार आहे. ही स्पर्धा आयची आणि नागोया येथे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार असून यासाठी नेहमीप्रमाणे गेम व्हिलेज (खेळाडूंचे गाव) असणार नाही, तर या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था कंटेनर, क्रूझ जहाजे आणि इतर ठिकाणी केली जाणार आहे. यासाठी तेथील व्यवस्थेची सवय होण्यासाठी भारतीय खेळाडूंचा एक अनोखा सराव सुरू आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) खेळाडूंना जपानमधील संभाव्य मर्यादित निवासव्यवस्थेची सवय व्हावी, यासाठी बंगळुरू आणि पटियाला येथे ‘कंटेनर-स्टाइल’ निवास स्थान तयार केले आहेत. तेथे खेळाडू जपानच्या अनोख्या वातावरणाशी आणि सोई-सुविधेशी जुळवून घेण्यासाठी आळीपाळीने रात्र घालवत आहेत.

कंटेनरची व्यवस्था नेमकी कशी?
सहा फुटांपेक्षा थोडा अधिक लांबीचा पलंग, सर्व बाजूंनी अरुंद भिंती, मर्यादित जागा आणि मधून जाणारी अरुंद गॅलरी अशी व्यवस्था एखाद्या खेळाडूंसाठी आरामदायक वाटत नाही, मात्र आजकाल भारतीय खेळाडू अशाच प्रकारच्या कंटेनरमध्ये रात्र घालवत आहेत.

साधारण 13 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद असलेल्या या कंटेनरच्या दोन्ही टोकांना दोन जणांसाठी बेडरुम्स आहेत. यामध्ये एसी, वॉशिंग मशीनसह एक लहान लॉंड्री एरिया, रेफ्रिजरेटर आणि सिंक असलेले छोटे किचन आहे. तसेच यामध्ये असलेल्या बाथरुममध्ये वॉश बेसिन, शौचालय आणि आंघोळीसाठी स्वतंत्र जागा देखील आहे.

कपडे आणि पुरेसे साहित्य ठेवण्यासाठी कपाट आणि बेडच्या खाली पुरेशी जागा आहे.

ही शिक्षा किंवा सक्ती नसून एक तयारीच आहे. जपानमध्ये पारंपरिक ऍथलेटिक्स व्हिलेज असणार नाही. त्यामुळे तेथिल स्थितीशी जुळवून घेण्यासाठी भारतीय खेळाडूंसाठी SAI ने कंटेनर व्हिलेज तयार केले आहे. मानसिकदृष्ट्या तयार करण्याचा यामागचा उद्देश आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी हे स्पष्ट झाले होते की जपानमधील खेळाडूंची निवासव्यवस्था पारंपरिक खेळाडू गावासारखी असणार नाही. त्यामुळे खेळाडूंना अशाच प्रकारच्या वातावरणाशी जुळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे SAI चे उपमहासंचालक आणि NSNIS पटियालाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक विनीत कुमार यांनी म्हटले आहे.

कंटेनरची तयारी 6 फूट 4 उंच उंचीचा गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग याला चांगली वाटली. त्यानेही याचा अनुभव घेतला.

जुन्या कंटेनरला लावले कामाला
या अनोख्या सुविधेसाठी नवे कंटेनर खरेदी केले गेले नाहीत. कोविड 19 काळात NSNIS पटियाला येथे असलेल्या कंटेनर्सचा वापर वेटलिफ्टिंग आणि ऍथलेटिक्सचे साहित्य ठेवण्यासाठी केला जात होता. आता त्याचे आशियाई खेळांच्या तयारीसाठी सिम्युलेटरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. (VIDEO: Indian athletes to stay in ‘containers’! Unique preparations for medals at 2026 Asian Games in Japan)

Comments are closed.