वीज निर्मितीला मोठा धोका? ५० औष्णिक प्रकल्पांमध्ये कोळसा साठा चिंताजनक – TMarathiNews
नवी दिल्ली : देशातील औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा झपाट्याने घटल्याने वीज क्षेत्रासमोरील चिंता वाढली आहे. 2 सप्टेंबरपर्यंत देशातील 50 औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा ‘गंभीर’ पातळीवर पोहोचला आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या (CEA) आकडेवारीनुसार, या प्रकल्पांमध्ये निर्धारित प्रमाणाच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी कोळसा उपलब्ध आहे.
या 50 प्रकल्पांची एकत्रित वीज निर्मिती क्षमता सुमारे 224 गिगावॅट असून, त्यांच्याकडे 28.2 दशलक्ष टन कोळशाचा साठा आहे. हा साठा निर्धारित 58.7 दशलक्ष टनांच्या तुलनेत केवळ 48 टक्के आहे. सध्याच्या वापराच्या दरानुसार हा साठा सुमारे नऊ दिवसांसाठी पुरेल. सर्वसाधारणपणे औष्णिक वीज प्रकल्पांकडे सुमारे 19 दिवसांचा कोळसा साठा असणे अपेक्षित आहे.
45 प्रकल्प देशांतर्गत कोळशावर अवलंबून
‘गंभीर’ श्रेणीत असलेल्या 50 प्रकल्पांपैकी 45 प्रकल्प देशांतर्गत कोळशावर, चार प्रकल्प आयात केलेल्या कोळशावर, तर एका प्रकल्पात वॉशरी रिजेक्ट्सचा वापर केला जातो. CEAच्या निकषांनुसार निर्धारित साठ्याच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी साठा असलेल्या प्रकल्पांना या श्रेणीत ठेवले जाते.
मात्र, कोळसा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती म्हणजे वीज प्रकल्पांमध्ये कोळसा संपण्याची स्थिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘गंभीर’ अशी श्रेणी ही नियमित देखरेखीसाठी वापरली जाणारी व्यवस्था असून, अशा प्रकल्पांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांना प्राधान्याने कोळशाचा पुरवठा केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पावसाळ्यामुळे पुरवठ्यावर परिणाम
दरवर्षी पावसाळ्यात कोळसा उत्खनन आणि वाहतुकीवर परिणाम होतो. यंदाही मान्सूनमुळे कोळशाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्याचवेळी देशातील विजेची मागणी वाढल्याने औष्णिक प्रकल्पांवरील दबाव आणखी वाढला आहे.
कोळसा मंत्रालयाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, कोळशाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. काही औष्णिक वीज प्रकल्पांना वीज निर्मिती सातत्याने सुरू ठेवण्यासाठी नियोजित देखभालकामे पुढे ढकलण्यासही सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मान्सूनचा जोर कमी झाल्यानंतर सप्टेंबरपासून कोळशाचा पुरवठा सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात कोळसा साठ्याची स्थिती सुधारते का, याकडे वीज क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.