बडगाममध्ये लष्कराची मोठी कारवाई; लष्कर-ए-तौयबाचा कमांडर यासीर ठार – TMarathiNews

बडगाम: जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. युसमर्ग आणि अशदर परिसरातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तौयबाचा पाकिस्तानी कमांडर यासीर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘ऑपरेशन अशदर’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेस आणि 53 राष्ट्रीय रायफल्सने जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) सहकार्याने ही संयुक्त मोहीम राबवली. युसमर्गच्या उंच भागात यासीर लपून बसल्याची गुप्त माहिती चिनार कॉर्प्सला मिळाली होती. त्यानंतर अशदर गली परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरू करण्यात आली.

शोधमोहीम सुरू असताना सुरक्षा दलांना दहशतवाद्याच्या हालचालींची माहिती मिळाली. जवानांनी परिसराला घेराव घातल्यानंतर दहशतवाद्याने गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत यासीर ठार झाला.

लष्करचे नेटवर्क पुन्हा उभारण्यात भूमिका

माध्यमांतील वृत्तांनुसार, यासीर हा लष्कर-ए-तौयबाच्या सुलेमान मूसा गटाशी संबंधित होता. मात्र, सुमारे वर्षभरापूर्वी त्याने या गटापासून वेगळे होत स्वतंत्रपणे दहशतवादी कारवाया सुरू केल्याचे सांगितले जाते. बडगाम परिसरात लष्कर-ए-तौयबाचे नेटवर्क पुन्हा सक्रिय करण्यातही त्याची भूमिका असल्याची माहिती समोर आली आहे.

सीमावर्ती भागातही शोधमोहीम

दरम्यान, सांबा जिल्ह्यातील रीगल, चिल्लेरियां, नडाला आणि प्लूरा या सीमावर्ती गावांमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाने (BSF) संयुक्त शोधमोहीम सुरू केली आहे. संवेदनशील भागांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तैनात करण्यात आली असून, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

बडगाममधील या कारवाईनंतर सुरक्षा दलांनी परिसरातील दहशतवादी नेटवर्कविरोधातील कारवाया आणखी तीव्र केल्या आहेत.

Comments are closed.