सरकारी भरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती
एमपीएससी, टीईटी परीक्षांच्या पेपरफुटीची गंभीर दखल घेत सरकारी नोकरभरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती विविध शासकीय विभागांच्या भरतीसाठी घेतल्या जाणाऱया परीक्षांबाबत सखोल अभ्यास करून उपायोजना सुचविणार आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. एमपीएसीच्या पेपरफुटी प्रकरणात आयोगाच्या अधिकाऱयांना अटक झाली आहे. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याने भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यापूर्वी पेपरफुटीमुळे टीईटी परीक्षादेखील रद्द करत लांबणीवर टाकण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत शासकीय भरती प्रक्रियेतील परीक्षांच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सात सदस्यांची उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील भरती परीक्षांच्या विद्यमान पद्धतीचे संपूर्ण पुनर्विलोकन करून आवश्यक सुधारणा सुचविणार आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचा या समितीकडून सखोल अभ्यास केला जाणार आहे.
इतर देशांतील परीक्षा पद्धतींचा अभ्यास
इतर राज्यांमध्ये राबविल्या जाणाऱया उत्तम पद्धतींचा तसेच आवश्यकतेनुसार इतर देशांतील परीक्षा प्रणालींचाही अभ्यास समिती करणार आहे. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, शिक्षण विभाग, परीक्षा संस्था आणि अन्य संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वयासाठी संस्थात्मक कार्यपद्धती सुचविण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक महसुली विभागाला भेट देऊन विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि अन्य संबंधितांशी प्रत्यक्ष अथवा ऑनलाइन संवाद साधून त्यांच्या सूचना घेतल्या जाणार आहेत.
समितीत कोण?
अपर मुख्य सचिव व्ही. राधा, पोलीस महासंचालक सदानंद दाते, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, यूपीएससीचे माजी सदस्य अजित भोसले, आयआयटी मुंबईचे प्रा. श्यामप्रसाद करगड्डे यांचा या समितीत समावेश आहे.
पेपरफुटीपासून डिजिटल सुरक्षेपर्यंत अभ्यास
ही समिती पेपरफुटीपासून डिजिटल सुरक्षेपर्यंत अभ्यास करून उपायोजना सुचविणार आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षण, विविध प्रश्नसंच तयार करणे, मुद्रित अथवा डिजिटल वितरण, गोपनीयता, प्रश्नपत्रिकांची वाहतूक, परीक्षा संचालन इत्यादींचा अभ्यास केला जाणार आहे. प्रश्नपत्रिका फुटणे, तोतया उमेदवार, प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर यांसारख्या गैरप्रकारांवर ही समिती उपाय सुचविणार आहे.
Comments are closed.