पंतप्रधान मोदींचा शिक्षकांशी संवाद

शिक्षकदिनानिमित्त कार्यक्रम, पुरस्कारविजेत्यांचा सहभाग, विद्यार्थ्यांचे कौशल्यसंवर्धन अत्यावश्यक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

शिक्षकदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधला आहे. त्यांनी या शिक्षकांना आपल्या अधिकृत निवासस्थानी शुक्रवारी आमंत्रित केले. अनेक शिक्षकांनी या कार्यक्रमात भाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली आणि काही महत्वाच्या सूचनाही केल्या. साधारणत: दोन तास हा कार्यक्रम चालला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचा व्हिडीओ ‘एक्स’वर प्रसारित केला आहे. आपल्या समाजाच्या उन्नतीत शिक्षकांचे योगदान हे अत्यंत मोलाचे आणि परिणामकारक असते. त्यामुळे शिक्षक दिनाच्या निमित्ताने देश शिक्षकांचा सन्मान करतो आणि त्यांच्यासंबंधी कृतज्ञताभाव व्यक्त करतो. या दिवशी आपण डॉ. एस. राधाकृष्णन यांनाही अभिवादन करतो, अशी माहितीही त्यांनी प्रसारित केली आहे.

स्रीन टाईम, अंमली पदार्थांवर चिंता

अलिकडच्या काळात विद्यार्थी मोबाईलमध्ये गुंतून गेलेले दिसून येतात. त्यांचा ‘स्क्रीन टाईम’ वाढला आहे. विद्यार्थ्यांचे हे व्यसन घालविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात खेळांमध्ये सहभागी झाले पाहिजे. समाजात मिसळले पाहिजे. अंतर्मुख राहण्याऐवजी बाहेरच्या जगाशी संबंध जोडला पाहिजे. तर त्यांच्या प्रकृती आणि मन दोन्ही निरोगी राहील, अशा अर्थाची सूचना त्यांनी केली. विद्यार्थी आणि युवकांभोवती अंमली पदार्थांचा विळखाही घट्ट होत चालला आहे. त्यामुळे अनेक युवकांचे जीवनच उध्वस्त होत आहे. ही चिंतेची बाब असून शिक्षक, पालक आणि समाज यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना या हानीकारक व्यसनांपासून दूर करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे.

देशभरातील शिक्षकांशी संवाद

हा कार्यक्रम जरी आपल्या निवासस्थानात मोजक्या शिक्षकांसमवेत होत असला, तरी तो संपूर्ण शैक्षणिक समाजाशी निगडीत आहे. आज शिक्षकांवर फार मोठे उत्तरदायित्व येऊन पडलेले आहे. विद्यार्थ्यांच्या महत्वाकांक्षा त्यांनी फुलवायच्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यापुस्तकांमध्ये अडकवून न ठेवता जगाचा आस्वाद घेण्याची क्षमता त्यांच्या ठायी निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्यांचे बालपण हरविता कामा नये. ते सुरक्षित ठेवण्याचे महत्वाचे उत्तरदायित्व शिक्षकांचे आहे. शिक्षक हा विद्यार्थ्याच्या भवितव्याचा आधार आहे, अशी मांडणी त्यांनी केली आहे.

सुप्त प्रतिभा जागृत करा

साचेबद्ध अभ्यासात प्रगती नसलेल्या विद्यार्थ्यांमध्येही अनेक सुप्तगुण आणि प्रतिभा असू शकते. अशी सुप्त प्रतिभा जागृत करण्याचे महत्वाचे कार्य शिक्षकाला करावे लागते. प्रचलित अभ्यासक्रमातच विद्यार्थ्याला गुंतवून ठेवण्यापेक्षा त्याला त्याच्या सुप्तगुणांची जाणीव करुन देऊन त्याचा आत्मविश्वास वाढविण्याचे महान कार्य शिक्षकालाच करायचे आहे, अशीही सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

शिक्षकांनी कथन केले अनुभव

या कार्यक्रमात भाग घेतलेल्या शिक्षक-शिक्षिकांनी त्यांनी चालविलेली अभियाने, केलेले कार्य, चालविलेल्या चळवळी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वंकष हितासाठी केलेले प्रयोग यांची माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. चांगले मुलाखतकार कसे बनावे, याचे शिक्षण मी विद्यार्थ्यांना देत आहे. त्यामुळे आज माझ्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण पत्रकार बनण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती एका शिक्षिकेने दिली. यावर, या विद्यार्थ्यांनी आता आपल्या मातापित्यांच्या मुलाखती घ्याव्यात आणि त्यांना बोलते करावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करताच उपस्थित शिक्षकांमध्ये हशा पिकला. इतरही अनेक शिक्षकांनी त्यांनी चालविलेल्या अभिनव उपक्रमांची माहिती या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे.

मोलाच्या सूचना

ड विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना फुलवून बाहेर आणण्याचे उत्तरदायित्व शिक्षकांवर

ड विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ आणि ‘स्क्रीन टाईम’ व्यसनांपासून दूर ठेवले जावे

ड विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातील सुसंवादामुळे मिटू शकतात समस्या

ड विद्यार्थ्यांच्या हितासाठी अभिनव उपक्रम कार्यान्वित करणे आहे हितकारक

 

Comments are closed.