९९,९९,९९९ मूर्तींचे शहर

आपला भारत अनेक अद्भूत स्थानांनी भरलेला देश आहे. अशी अनेक धार्मिक स्थाने येथे आहेत, की जेथे काहीकाळ वास्तव्य केल्याने आपल्याला दिव्यत्वाचा अनुभव येतो. अशा स्थानांना जोडलेल्या लोककथाही अत्यंत स्वारस्यपूर्ण असतात. शिल्पे आणि लेणी असणाऱ्या प्राचीन गुहा, इतिहासप्रसिद्ध गावे आणि नगरे, निसर्गरम्य स्थाने आदींची आपल्या देशात रेलचेल आहे. ईशान्य भारतातील त्रिपुरा या राज्यात असेच एक स्थान आहे, जे देवतेवतांच्या मूर्तींचे नगर म्हणून परिचित आहे. घनदाट वन आणि उंच पर्वत यांनी वेढलेले हे नगर खडकांवर प्राचीन काळी कोरलेल्या देवदेवतांच्या आकृत्यांसाठी प्रसिद्ध आहे.

तसेच दगडांपासून निर्माण केलेल्या असंख्य मूर्ती आणि शिल्पाकृतीही येथे आहेत. या आकृती, मूर्ती आणि शिल्पांची संख्या 99 लक्ष 99 सहस्र 999 इतकी आहे, असे ही गणना केलेल्यांचे म्हणणे आहे. याचा अर्थ असा की संख्या एक कोटीपेक्षा केवळ एकने कमी आहे. या स्थानाचे नाव उनाकोटी असे आहे. आकृती, मूर्ती आणि शिल्पांची संख्या एक कोटी का करण्यात आली नाही, हा बऱ्याच काळापासून चर्चेचा आणि विवादाचाही विषय आहे. येथील निवासींच्या म्हणण्यानुसार याचे कारण एका पौराणिक प्रसंगात दडलेले आहे. उनाकोटी हे भगवान श्री शंकरांना समर्पित केलेले एक शैव तीर्थस्थळ आहे. पुराणकाळात भवगान शिवशंकर आपल्यासह 99 लक्ष 99 सहस्र 999 देवदेवतांना घेऊन तीर्थयात्रेसाठी निघाले होते. या नगरात ते आले तेव्हा रात्र झाली होती आणि शंकरांसह या देवदेवता येथेच निद्राधीन झाल्या. पहाटे उठून काशीस्थळी जायचे आहे, असे भगवान शंकरांनी स्पष्ट केले होते. तथापि, पहाटे केवळ भगवान शंकरच जागे झाले. त्यांनी उठून अन्य देवतेवतांना जागे करण्याचा प्रयत्न केला पण ते उठले नाहीत. त्यामुळे नाराज होऊन भगवान शंकर एकटेच काशीक्षेत्री निघून गेले. इतर 99,99,999 देवदेवता तेथेच निद्रिस्त राहिल्या. त्या कालांतराने मूर्ती, शिल्पे आणि आकृती यांच्यात परिवर्तीत झाल्या. त्यामुळे या नगरात एक कोटीला एक कमी इतक्या संख्येने देवतेवता आहेत, असे या पौराणिक कथेत स्पष्ट करण्यात आले आहे. ही कथा चांगलीच लोकप्रिय आहे.

Comments are closed.