ENG vs PAK Test – इंग्लंडमध्ये संपूर्ण पाकिस्तानी टीमचे मोबाईल फोन जप्त, मॅच फिक्सिंग की आणखी काही? चर्चांना उधाण

पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या दोन्ही कसोटीत सपाटून मार खाल्ल्याने पाकिस्तानने ही मालिका आधीच गमावली आहे. तिसरा सामना 9 सप्टेंबरपासून सुरू होत असून तत्पूर्वी पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. एजबेस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्याच खेळाडूंचे मोबाईल फोन अचानक जप्त केले आहेत. हे फोन मालिका संपेपर्यंत बोर्डाच्याच ताब्यात राहणार असून, या कारवाईमुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.

पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये अचानक कारवाई करत खेळाडूंचे वैयक्तिक मोबाईल फोन ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, ही कारवाई नक्की कोणत्या खेळाडूंवर करण्यात आली आणि यामागचे मूळ कारण काय आहे, यावर पीसीबीने मौन बाळगले आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी 365 न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे.

पीसीबीच्या या कारवाईनंतर क्रिकेट वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आणि फिक्सिंगचे जुने डाग पाहता, बोर्डाला पुन्हा तसाच काही प्रकार घडण्याची भीती वाटत आहे का? शिस्तभंग की अंतर्गत वाद? संघातील वाढता अंतर्गत वाद, ड्रेसिंग रूममधील गुप्त माहिती लीक होणे किंवा सोशल मीडियाचा अतिवापर रोखण्यासाठी ही कारवाई केली गेली आहे का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, पीसीबीच्या या कारवाईमुळे खेळाडूंच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा तापला आहे. सामन्याच्या दिवशी सुरक्षेचा भाग म्हणून किंवा नियमांनुसार ड्रेसिंग रूममध्ये फोन जमा करणे समजण्यासारखे आहे. परंतु, मालिका सुरू असताना सलग काही दिवस खेळाडूंचे वैयक्तिक फोन आपल्याकडे ठेवून घेणे हा खेळाडूंच्या खासगी आयुष्यावर गदा आणणारा प्रकार असल्याची टीका आता होऊ लागली आहे.

मानव सुथारची इंग्लंडमध्येही ‘सत्ता’; काैंटी क्रिकेटमध्ये पटकावल्या सात विकेट्स

आयसीसीचे कडक नियम काय सांगतात?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू आणि मोबाईल फोनबाबत आयसीसीचे नियम अतिशय स्पष्ट आणि कडक आहेत. ड्रेसिंग रूम आणि मॅच डे: सामन्याच्या दिवशी ड्रेसिंग रूम किंवा प्रतिबंधित भागात खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोणत्याही कम्युनिकेशन डिव्हाइसचा वापर करण्यास सक्त मनाई असते. खेळाची पारदर्शकता टिकवण्यासाठी फोन आधीच अधिकाऱ्यांकडे जमा करावे लागतात. जर आयसीसीच्या भ्रष्टाचाराविरोधी पथकाला एखाद्या खेळाडूवर किंवा सामन्यावर संशय आला, तर त्यांना संबंधित खेळाडूचा फोन, कॉल रेकॉर्ड, मेसेज, चॅट, फोटो, व्हिडिओ आणि अगदी फोनचा पासवर्ड मागण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे.

Comments are closed.