VIDEO: वैभव सूर्यवंशीने मोहम्मद सिराजला चांगलेच धुतले! दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये मात्र 6 धावांनी झाला स्वप्नभंग

चेन्नईमध्ये आजपासून (रविवार, 6 ऑगस्ट) दुलीप ट्रॉफी 2026 चा अंतिम सामना खेळला जात आहे. यामध्ये ईशान किशनच्या नेतृत्वाखालील ईस्ट झोन (पूर्व विभाग) आणि तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील साउथ झोन (दक्षिण विभाग) यांची विजेतेपदासाठी लढत सुरू आहे. प्रभावी सुरूवात करून देणाऱ्या वैभव सूर्यवंशीचे अर्धशतकाचे स्वप्न भंगले.

चेपॉकवर सुरू असलेल्या या सामन्यात ईशानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सलामीवीर वैभव आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी सार्थ ठरवला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 88 चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. ही भागीदारी तोडण्यात चामा व्ही मिलिंद याला यश आले. त्याने वैभवला 44 धावांवर बाद केले. तत्पूर्व 15 वर्षीय फलंदाजाने मोहम्मद सिराजचा चांगलाच समाचार घेतला.

सामन्याच्या ईस्ट झोनच्या पहिल्या डावातील सातव्या षटकात वैभवने सिराजच्या गोलंदाजीवर 14 धावा वसूल केल्या. त्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वैभवने एकही धाव घेतली नाही, मात्र दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारला. तसेच त्याने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारला.

वैभवची फलंदाजी पाहून तिलकने क्षेत्ररक्षणात काही बदल केले. त्यानंतर ईश्वरनने काही शॉट्स खेळले आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. डावाच्या 14.4 षटकात मिलिंदने टाकलेल्या चेंडूवर वैभव बाद झाला. तो चेंडू शॉर्ट होता आणि बॅटला लागून डीप स्क्वेयर लेगला उभ्या असलेल्या तनयने तो उत्तमरित्या झेलला. यामुळे पुन्हा एकदा वैभवचे मोठी खेळी करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

वैभवने सेंट्रल झोनविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही शतक आणि अर्धशतक करण्याची संधी गमावली होती.

पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेक झाला असता ईस्ट झोनने 27 षटकांत 2 विकेट्स गमावत 133 धावा केल्या होत्या. ईश्वरन 72 धावा करत बाद झाला.

Comments are closed.