पूर्ण स्वयंपाकाऐवजी Smart Meal Prep ची क्रेझ

धावपळीच्या जीवनशैलीत रोज सकाळी उठून नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचा स्वयंपाक करणं अनेकांसाठी वेळखाऊ ठरतंय. त्यामुळे आता रोज पूर्ण स्वयंपाक करण्याऐवजी आठवड्याच्या सुरुवातीलाच काही पदार्थांची पूर्वतयारी करून ठेवण्याचा स्मार्ट मील प्रेपचा ट्रेंड लोकप्रिय होत आहे. यामुळे स्वयंपाकाचा वेळ कमी होतो आणि ऐनवेळी बाहेरचं खाणं टाळणंही सोपं जातं.

भाज्या चिरून ठेवणे

आठवडाभर लागणाऱ्या भाज्या स्वच्छ धुऊन, व्यवस्थित वाळवून कापून हवाबंद डब्यांमध्ये ठेवता येतात. त्यामुळे रोज भाजी कापण्यात जाणारा वेळ वाचतो.

कडधान्यांची पूर्वतयारी

हरभरा, मूग, राजमा यांसारखी कडधान्ये आधी भिजवून किंवा उकडून ठेवली तर ऐनवेळी भाजी, उसळ किंवा सॅलड तयार करणं सोपं होतं.

नाश्त्याचीही करा तयारी

पोहे, उपमा किंवा थालीपीठासाठी लागणारे साहित्य आधीच मोजून आणि तयार ठेवता येतं. त्यामुळे सकाळची घाई कमी होते.

जेवणाचं नियोजन ठरवा

आठवड्यात कोणत्या दिवशी काय बनवायचं, याचं साधं नियोजन केल्याने रोज आज काय बनवायचं हा प्रश्न पडत नाही. उपलब्ध साहित्याचा योग्य वापरही करता येतो.

वेळेसह खर्चही वाचतो

मील प्रेपमुळे गरजेपुरतंच सामान खरेदी करता येतं आणि उरलेलं अन्न वाया जाण्याची शक्यताही कमी होते. मात्र तयार केलेले पदार्थ योग्य पद्धतीने साठवणे आणि गरजेनुसार ताजे करून खाणे महत्त्वाचे आहे.

Comments are closed.