AK-203 काडतुसे भारतातच बनवली जाणार आहेत.

अदानी डिफेन्सचा रशियन कंपनीसोबत करार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अदानी डिफेन्स अँड एअरोस्पेसने इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत (आयआरआरपीएल) गोळी अन् दारूगोळ्याच्या पुरवठ्यासाठी 5 वर्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे. याच्या अंतर्गत कंपनी एके-203 असॉल्ट रायफल्ससाठी 7.62×39 मिमीची काडतुसे तयार करणार आहे.

आयआरआरपीएल भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम असून तो भारतात एके-203 असॉल्ट रायफल्सची निर्मिती करतो. या उपक्रमाला केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ धोरणाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आले आहे. अलिकडेच या प्रकल्पाने 100 टक्के स्थानिकीकरणाचे लक्ष्य प्राप्त केले आहे, म्हणजेच आता या रायफलचा प्रत्येक सुटा भाग भारतातच निर्माण होतोय. तर अदानी डिफेन्सने भारतात छोट्या कॅलिबरचे काडतूस आणि दारूगोळ्याच्या उत्पादनासाठी कानपूरमध्ये एक प्रकल्प स्थापन केला आहे.

विदेशी कंपन्यांवरील निर्भरता घटणार

अदानी डिफेन्ससोबत झालेल्या या भागीदारीचा सर्वात मोठा लाभ म्हणजेच आता सैन्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रs आणि गोळ्यांची निर्मिती पूर्णपणे भारतातच होणार आहे. यामुळे विदेशी कंपन्यांवरील देशाची निर्भरता कमी होईल आणि भारतीय सैन्याला वेळेत शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुनिश्चित करता येऊ शकणार आहे.

अमेठीत रायफल्सची निर्मिती

इंडो-रशियन प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना 2019 साली झाली होती. याचा उत्पादन प्रकल्प अमेठी जिल्ह्यातील कोरवा येथे स्थित आहे. केंद्र सरकारने डिसेंबर 2021 मध्ये कंपनीसोबत 6.01 लाख एके-203 रायफल्सच्या पुरवठ्यासाठी करारावर स्वाक्षरी केली होती. या प्रकल्पात आता वेगाने काम सुरू आहे.

Comments are closed.