अमेझॉनचे कार्गो विमान धावपट्टीवरून घसरले; 5 जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video आला समोर
मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी दुपारी एका भीषण अपघात झाला. अमेझॉन प्राईम एअरचे एक मोठे मालवाहू विमान उतरताना अचानक धावपट्टीवरून घसरले आणि पुढे जाऊन अनेक गाड्यांना धडकले. या भीषण अपघातात आणि त्यानंतर लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा धडकी भरवणारा व्हिडीओही समोर आला आहे.
सान हुआन (प्वेर्तो रिको) येथून उड्डाण केलेले प्राईम एअर फ्लाईट 7598 हे बोईंग 767-300 विमान दुपारी 2 वाजेच्या सुमारास मियामी विमानतळावर उतरत होते. हे विमान 21 एअर या कंपनीमार्फत चालवले जात होते. लँडिंगदरम्यान नियंत्रण सुटल्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले आणि समोर उभ्या असलेल्या गाड्यांवर जाऊन धडकले. धडक होताच विमानाला भीषण आग लागली आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ट्रॉमा सेंटर येथे भरती करण्यात आले आहे, तर दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच मियामी-डेड फायर रेस्क्यूच्या 60 हून अधिक पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मियामी विमानतळावरील सर्व धावपट्ट्या आणि टॅक्सीवे तात्काळ बंद करण्यात आले असून सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.
अमेझॉनचे कार्गो विमान धावपट्टीवरून घसरले अन् गाड्यांना धडकले, 5 जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video आला समोर pic.twitter.com/gRJoyZU5MB
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 7 सप्टेंबर 2026
दरम्यान, या दुर्दैवी घटनेवर अमेझॉनच्या प्रवक्त्या केली नॅंटेल यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. ही अतिशय गंभीर आणि वेगाने बदलणारी परिस्थिती आहे. आम्ही स्थानिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत असून पीडितांना शक्य ती सर्व मदत पुरवणे हीच आमची प्राथमिकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

विमान का घसरलं? तपास सुरू
अमेरिकेची फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या यंत्रणांनी या भीषण अपघाताच्या उच्चस्तरीय तपासाला सुरुवात केली आहे. विमान घसरण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Comments are closed.