सात्विक-चिरागने पार केली ‘ग्रेट वॉल’! भारतासाठी जिंकले पहिले ‘चायना मास्टर्स’, एशियन गेम्सला बूस्ट

भारतीय बॅडमिंटनची स्टार जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी रविवारी (6 ऑगस्ट) इतिहास रचला. भारतीय जोडीने अंतिम सामन्यात हे जी टिंग-रेन शियांग यू यांचा 11-21, 21-13, 21-17 असा पराभव करून भारतासाठी पहिले ‘चायना मास्टर्स BWF सुपर 750’ विजेतेपद जिंकले. त्यांच्या या विजयामुळे याच महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 साठी आवश्यक अशी गती आणि आत्मविश्वास मिळाला आहे.

तीनदा अंतिम सामन्यात प्रवेश, दोन मन उदास करणारे पराभव आणि मोठ्या अपेक्षांच्या संघर्षानंतर अखेर सात्विक-चिराग जोडीने चायना मास्टर्सचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात एक सेटने मागे असताना भारतीय जोडीने जबरदस्त खेळ करत पुनरागमन केले. एक तास आणि 10 मिनिटे चाललेल्या या सामन्याचा निकाल तीन सेटमध्ये लागला.

भारतीय जोडीचे हे या हंगामातील दुसरे विजेतेपद आहे. याआधी त्यांनी सिंगापूर ओपन सुपर 750 जिंकले होते. तसेच ते थायलंड ओपन सुपर 500 च्या अंतिम फेरीतही पोहोचले होते. आता दोघे 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या सुवर्णपदक कायम राखण्याच्या तयारीत असतील. ही जोडी सध्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.

अंतिम सामन्यात हे-रेन यांनी भारतीय जोडीला चांगलेच आव्हान दिले. त्यांनी पहिला सेट 21-11 असा जिंकत सामन्यात आघाडी घेतली होती. 2023 आणि 2025 च्या आवृत्त्यांमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानाव्या लागलेल्या सात्विक-चिराग यांनी आणखी एक संधी हातातून जाऊ दिली नाही. त्यांनी दुसऱ्या सेटमध्ये सामन्याचे चित्र पालटवले.

चिरागने नेटजवळ जात लवकर शटल अडवण्यास सुरूवात केली. त्यामुळे चिनी जोडीवर दबाव आला. या बदलामुळे भारतीय जोडीचा बचाव सुधारला आणि त्यांनी स्मॅशच्या साहाय्याने हल्ले केले. भारतीय जोडीने दुसरा सेट 21-13 असा जिंकत सामना बरोबरीत केला.

निर्णायक सेटमध्ये दोन्ही जोड्या आक्रमक खेळल्या, ज्यामध्ये चिनी जोडीने एका वेळेस 11-10 अशी आघाडी घेतली होती. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचा दबाव चिनी खेळाडूंवर जाणवला आणि त्यांन काही चुका केल्या. त्यामुळे भारतीय जोडीने 18-17 अशी आघाडी घेतली. नंतर त्यांनी काहीच चुका केल्या नाही.

सात्विक आत्मविश्वासाने परिपूर्ण दिसत होता. त्याने एक धाडसी फ्लिक सर्व्ह केला, ज्यामुळे चिनी खेळाडूंचा तोल गेला आणि भारतीय जोडीला मॅच पॉइंट मिळाला. सात्विक-चिराग यांनी शेवटच्या क्षणापर्यंत संयम राखला. त्यामुळे त्यांचे पहिले चायना मास्टर्स जिंकण्याचे स्वप्न साकार झाले.

दीर्घकाळाच्या अनुपस्थितीमुळे चिनी जोडी जागतिक क्रमवारीत घसरून 70 व्या स्थानावर आली. भारतीय जोडीने या विजयाबरोबर हे-रेन यांच्याविरुद्ध आपला हेड टू हेड विक्रम 3-0 असा वाढवला. (The Indian pair of Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty clinched India’s maiden ‘China Masters’ title in men’s doubles.)

Comments are closed.