Buldhana News – शेतकऱ्यांचा अंत पाहू नका; तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा – आमदार सिद्धार्थ खरात
पावसाने गेल्या महिनाभरापासून दडी मारल्याने खरीप पिके हातातून जाण्याची वेळ आली आहे. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला असताना शासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे. आता सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा थेट इशारा देत तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली आहे.
सोयाबीन, उडीद, मका यासह विविध खरीप पिके सध्या फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहेत. याच निर्णायक टप्प्यावर पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे पीक करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाची प्रतीक्षा करत शेतकरी दिवसेंदिवस संकटात सापडत असून, उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे.
शेतकऱ्याने कष्टाने पेरलेले बी आज उभ्या पिकात रूपांतरित झाले आहे. त्या पिकाकडे पाहताना त्याला आपल्या कुटुंबाच्या उद्याची स्वप्ने दिसतात. मात्र पाऊसच गायब झाल्याने ही स्वप्ने डोळ्यांसमोर कोमेजण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्याच्या घामाची किंमत सरकारने ओळखावी आणि संकटाच्या या काळात त्याला वाऱ्यावर सोडू नये. काल-परवापर्यंत पाऊस आला असता तर काही प्रमाणात पीक वाचवता आले असते. मात्र आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर संकट कोसळले असताना सरकारने केवळ कागदी घोषणा न करता प्रत्यक्ष मदत करण्याची भूमिका घ्यावी, अशी भूमिका आमदार खरात यांनी मांडली. शासनाने तातडीने परिस्थितीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी शासन निर्णय काढावा, तसेच कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीकविमा आणि आवश्यक सवलतींचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचा घाम वाया जाऊ देणार नाही आणि त्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केला.
Comments are closed.