यूएनच्या नव्या नकाशावरून वाद

अरुणाचल-अक्साई चीन भारतापासून वेगळा दाखविण्याची आगळीक

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत 4 सप्टेंबर रोजी ‘करेक्ट द मॅप’ नावाचा एक प्रस्ताव संमत करण्यात आला होता. याचा उद्देश 16 व्या शतकातील जुन्या मर्केंटर प्रोजेक्शन मॅपमधील त्रुटी दूर करणे आणि आफ्रिका, दक्षिण अमेरिका तसेच दक्षिण आशिया यासारख्या भूमध्यरेषीय क्षेत्रांच्या वास्तविक आकाराला अधिक अचूकपणे दाखविणाऱ्या समान-क्षेत्र नकाशांना प्रोत्साहन देणे आहे. भारताने देखील या प्रस्तावाचे समर्थन केले होते, परंतु संयुक्त राष्ट्रसंघाकडून जगाचा नवा नकाशा जारी करण्यात आल्यावर भारताने संताप व्यक्त केला आहे. या नकाशात भारतातील राज्य अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनला वेगवेगळे भाग म्हणून दाखविण्यात आले आहे.

हा नकाशा पहिल्यांदा 1 जुलै रोजी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान प्रकाशित करण्यात आला होता. यात अरुणाचल प्रदेशची नागालँडसोबतची सीमा हटविण्यात आली आणि या क्षेत्रात आसाम आणि चीनच्या सीमांना लागून असलेल्या एका स्वतंत्र राज्याच्या रुपात दाखविण्यात आले आहे. अशाचप्रकारे नकाशात अक्साई चीनला एक स्वतंत्र क्षेत्र म्हणून दाखविण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने या बदलांमागे कुठलेच कारण सांगितलेले नाही.

नकाशात एक डॉटेड लाइन

नकाशात एक डॉटेड लाइन देखील दाखविण्यात आली असून ती भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या नियंत्रण रेषेला दर्शविते. तर संयुक्त राष्ट्रसंघाने नकाशाच्या फूटनोटमध्ये जम्मू-काश्मीरच्या अंतिम स्थितीवर संबंधित पक्षांदरम्यान अद्याप कुठलीच सहमती झाली नसल्याचे म्हटले गेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचा हा नकाशा मान्य करणे बंधनकारक नाही, परंतु जगभरातील बहुपक्षीय संस्था याला जगाचा नकाशा म्हणून स्वीकारू शकतात.

नव्या नकाशावर भूमिका

अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनला वेगळे दाखविणाऱ्या नकाशावर भारत सरकारने अद्याप कुठली टिप्पणी केलेली नाही. जम्मू-काश्मीर आणि लडाख, ज्यात अक्साई चीन देखील सामील आहे, तो भारताचा अविभाज्य भाग असल्याचे भारत सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे. तर अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे भारताने वारंवार ठणकावून सांगितले आहे.

Comments are closed.