कल्याणच्या रामबागेतील रस्त्यांची दुर्दशा, पालिका उपअभियंत्यांना घातली ‘खड्ड्यांची’ शाल; शिवसेनेच्या नगरसेविकांनी केला अनोखा ‘सत्कार’
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असतानाच कल्याणच्या रामबाग लेन नंबर चार परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांना खड्डे पडले आहेत. केडीएमसीच्या प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी लाखो रुपये खर्च करून रस्त्यांची डागडुजी केली. पण तेथील रस्ते पुन्हा उखडले. रस्त्यांच्या या दुर्दशेबाबत शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविकांनी अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर संतप्त झालेल्या नगरसेविकांनी आज केडीएमसीचे उपअभियंता भगतसिंग राजपूत यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना खड्ड्यांचे प्रतीक म्हणून फाटलेली शाल भेट दिली. या अनोख्या ‘सत्कारां’चीच आज पालिका वर्तुळात चर्चा सुरू होती.
कल्याणचा रामबाग परिसर मोठा असून तेथील लेन नंबर चार भागात तसेच अन्य ठिकाणीदेखील अनेक खड्डे रस्त्यांना पडले आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांचे अतोनात हाल होत आहेत. रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिकांचे ऐन गणपतीत प्रचंड हाल होणार आहेत. आतापर्यंत खड्यांमुळे अपघातदेखील झाले आहेत. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्थानिक नगरसेविका स्वप्नाली केणे आणि अपर्णा भोईर यांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. पण त्याची दखल न घेतल्याने अखेर त्यांनी केडीएमसीचे उपअभियंता भगतसिंग राजपूत यांच्या कार्यालयात दुपारी धडक देत अनोख्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. खड्डेमय रस्त्यांचे प्रतीक म्हणून खास तयार करण्यात आलेली खास शाल अधिकाऱ्यांच्या गळ्यात घालून त्यांचा चक्क ‘सत्कार’ करण्यात आला. स्वप्नाली केणे व अपर्णा भोईर यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले. दोन दिवसांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून बुजवण्यात आलेले रस्त्यावरील खड्डे पुन्हा उघडे पडल्याचे त्यांनी उपअभियंता राजपूत यांच्या निदर्शनास आणून दिले.
… तर मोठे आंदोलन छेडणार
यापुढे रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची करून नागरिकांना खरोखरच खड्डेमुक्त रस्ते दिले तर आम्ही यापेक्षा चांगली आणि सुंदर शाल देऊन तुमचा सत्कार करू, असा टोला नगरसेविका स्वप्नाली केणे व अपर्णा भोईर यांनी उपअभियंत्यांना लगावला. तसेच कल्याण पश्चिमेतील रामबाग चार नंबर परिसरासह विविध भागांतील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरवस्था सुधारली नाही तर अधिक तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.
Comments are closed.