अमेरिकन जनता मालामाल होणार! निवडणूक जिंकताच प्रत्येक नागरिकाला मिळणार 4 लाख रुपये, ट्रम्प यांची घोषणा
निवडणुकांच्या काळात जनतेसाठी विविध योजना आणून त्यांना स्वत:कडे वळवण्याची हिंदुस्थान सरकारची शक्कल आता अमेरिकेत पहायला मिळणार आहेत. हिंदुस्थान सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगामी निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे.
येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मिडटर्म निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाने अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विजय मिळवल्यास देशातील प्रत्येक प्रौढ नागरिकाला 5 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 4.76 लाख रुपये रोख देण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले आहे. या योजनेवर सरकारला तब्बल 1.22 ट्रिलियन डॉलर खर्च करावा लागू शकतो.
अमेरिकेवर सध्या सुमारे 40.10 ट्रिलियन डॉलरचे कर्ज आहे. अमेरिकेची लोकसंख्या जवळपास 34.29 कोटी आहे. यानुसार प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला सुमारे 1.17 लाख डॉलर इतके सरकारी कर्ज येते. देशात सुमारे 24.4 कोटी प्रौढ नागरिक आहेत. या सर्वांना 5 हजार डॉलर दिल्यास एकूण खर्च 1.22 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल. ही रक्कम जगातील सुमारे 170 देशांच्या वार्षिक GDP पेक्षाही मोठी असल्याचे उपलब्ध आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
या योजनेसाठी पैसा कुठून आणला जाणार, याबाबत ट्रम्प यांनी अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही. मात्र, ट्रम्प प्रशासनाकडून सरकारी खर्चात कपात, अनावश्यक खर्चाला आळा आणि डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE)च्या माध्यमातून बचत करून हा निधी उभारला जाऊ शकतो, असा दावा केला जात आहे. सरकारी व्यवस्थेत सुधारणा करून वाचवलेला पैसा करदात्यांना ‘डिव्हिडंड’च्या स्वरूपात परत दिला जावा, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. मात्र, ही योजना सुरू करण्यासाठी अमेरिकी संसदेकडून मंजुरी घेणे आवश्यक असेल.
Comments are closed.