वादग्रस्त वक्तव्यानंतर नेपाळच्या उद्योगमंत्र्यांचा राजीनामा, बालेन शहा मंत्रिमंडळाला तिसरा मोठा धक्का
नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आणि व्यावसायिक वितरकांवरील वादग्रस्त विधानानंतर उद्योग, वाणिज्य व पुरवठामंत्री गौरी कुमारी यादव यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान बालेन शहा यांच्याकडे सुपूर्द केला. या वर्षाच्या सुरुवातीला सत्तेवर आलेल्या बालेन शहा यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडणाऱ्या यादव या तिसऱ्या मंत्री ठरल्या आहेत.
नेपाळमध्ये विशेषतः काठमांडू खोऱ्यात रस्त्यांचे नुकसान आणि वाहतूक विस्कळीत झाल्याने गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित संसदीय समितीच्या बैठकीत बोलताना मंत्री गौरी कुमारी यादव यांनी खासगी गॅस कंपन्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत ताशेरे ओढले होते. देशातील सर्व ५८ गॅस कंपन्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी करत, त्यांनी गॅस वितरकांचे ‘हात पाठीमागे बांधून त्यांना सरळ करू’ असा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर व्यावसायिक क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आणि गॅस व्यावसायिकांनी थेट पंतप्रधानांकडे त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. या राजकीय वादळानंतर अवघ्या २४ तासांच्या आत यादव यांना पद सोडावे लागले.
आपल्या विधानात यादव यांनी असा आरोप केला होता की, पैसे देऊनही लोकांना गॅस मिळत नाही. ही देशासाठी अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. खासगी कंपन्या सरकार किंवा नेपाळ ऑइल कॉर्पोरेशनच्या (NOC) निर्देशांचे पालन करत नाहीत. नेपाळसारख्या देशाला केवळ दोन गॅस कंपन्या पुरेशा असून बाकीच्यांचे परवाने रद्द केले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. तसेच काठमांडूसाठी पाठवलेले हजारो सिलिंडर बाजारात पोहोचण्यापूर्वीच गायब होत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. खासगी क्षेत्रावर अवलंबून राहिल्याने फसवणूक झाली असून सरकारने स्वतःच्या अखत्यारीत गॅस वितरण सांभाळावे, असा दावा त्यांनी केला होता.
यापूर्वी बालेन शहा यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना वेगवेगळ्या वादांमुळे पद सोडावे लागले होते. आता गॅस टंचाईच्या गंभीर संकटादरम्यान उद्योगमंत्र्यांनीच तडकाफडकी राजीनामा दिल्याने बालेन शहा यांच्या सरकारसमोरील प्रशासकीय व राजकीय अडचणी आणखी वाढल्या आहेत.
Comments are closed.