सुरी झालीये बोथट? घरच्या घरी ‘या’ ट्रिक्सने करा धारदार
स्वयंपाकघरात सुरीचा वापर रोजच होतो. भाज्या, फळं किंवा इतर पदार्थ कापताना धारदार सुरीमुळे काम पटकन आणि सहज होतं. मात्र सततच्या वापरामुळे हळूहळू सुरीची धार कमी होते आणि कापताना जास्त जोर लावावा लागतो. अशावेळी लगेच नवीन सुरी घेण्याची गरज नाही. योग्य पद्धत आणि काळजी घेतली तर घरच्या घरीही सुरीची धार पुन्हा सुधारता येते. मात्र धार काढताना सुरक्षिततेची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
1) धारदार दगड
सुरी जास्त बोथट झाली असेल तर शार्पनिंग स्टोन उपयोगी ठरतो. वापरण्यापूर्वी स्टोन पाण्यात भिजवून घ्या. त्यानंतर सुरीची धार स्टोनवर साधारण 15 ते 20 अंशांच्या कोनात ठेवून हलक्या हाताने घासा. सुरीच्या दोन्ही बाजूंना समान पद्धतीने ही प्रक्रिया करा.
2) सिरॅमिक मग
घरात शार्पनिंग स्टोन नसेल तर जाड सिरॅमिक मगचा खालचा खरखरीत भाग काही प्रमाणात उपयोगी पडू शकतो. मग उलटा करून तो स्थिर पृष्ठभागावर ठेवा आणि धार त्या खरखरीत भागावर हलक्या हाताने घासा.
3) होनिंग रॉड
होनिंग रॉडचा वापर प्रामुख्याने आधीपासून असलेली धार सरळ करण्यासाठी केला जातो. म्हणजेच तो पूर्णपणे बोथट झालेल्या सुरीला नव्याने धार देण्यापेक्षा धार थोडी वाकली असेल, तर ती व्यवस्थित करण्यास मदत करतो. सुरीवर जास्त दबाव न देता समान कोनात दोन्ही बाजूंनी काही वेळ हलक्या हाताने घासा.
4) ॲल्युमिनियम फॉइल
वापरलेल्या किंवा ताज्या ॲल्युमिनियम फॉइलचा एक तुकडा घेऊन त्याचा घट्ट गोळा बनवा.या गोळ्यावर सुरीने वारंवार कापल्यासारखे (स्लाइस) करा. यामुळे सुरीच्या पात्यावरील खरबरीतपणा निघून जातो आणि ती तीक्ष्ण होते.
लक्षात ठेवा…
काच, संगमरवर किंवा दगडी पृष्ठभागावर थेट सुरी वपरणे टाळा. लाकडी किंवा योग्य दर्जाच्या प्लास्टिकच्या चॉपिंग बोर्डचा वापर करा. सुरी इतर भांड्यांमध्ये टाकून ठेवण्याऐवजी सुरक्षित ठिकाणी ठेवा.
Comments are closed.