थापा, फसवणूक आणि कामांच्या नुसत्या घोषणा… मराठवाड्याच्या विकासाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा मुखवटा फाडणारं आंदोलन! – संजय राऊत
बोलघेवड्या भाजप सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा पंचनामा करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘तुमसे ना हो पायेगा’ हे जनआंदोलन करण्यात येत आहे. नांदेड येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मराठवाड्याच्या विकासाच्या नावाखाली लोकांची कशी फसवणूक केली त्याचा मुखवटा फाडणारे हे आंदोलन आहे, असे यावेळी संजय राऊत म्हणाले.
कामांच्या नुसत्या घोषणा केल्या, भूमीपूजन केले. पण कामं अर्धवट पडली. मराठवाड्याच्या विकासाच्या नावाखाली लोकांची कशी फसवणूक केली त्याचा मुखवटा फाडणारे हे आंदोलन आहे. फसव्या सरकारविरुद्ध मराठवाड्यामध्ये लोकजागृती आंदोलन आहे. 780 कामांच्या घोषणा झाल्या, मुहूर्त झाले, त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला. या काळात नांदेडचे प्रमुख नेते भाजपात गेले. नांदेडची गॅरंटी त्यांनी घेतली. आज संपूर्ण मराठवाडा भाजपमय आहे, पण मराठवाड्याला काय मिळाले? फक्त थापा आणि फसवणूक, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
राज्यात आज दुष्काळाची आणि शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे. यावर इथे एकही राज्यकर्ता गांभीर्याने बोलताना दिसतोय का? अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस आणि या भागातील मंत्री यावर बोलाताहेत का किंवा फिरताहेत का? असा सवाल करत संजय राऊत म्हणाले की, अशा परिस्थितीत विरोधी पक्षाचे काम आहे की या प्रश्नांची लक्तरे सरकार समोर मांडायची आणि आंदोलन करायची. आम्ही आंदोलन केल्यावर फडणवीस आमची चेष्टा करतात.
खरे म्हणजे विरोधी पक्ष जनतेची गाऱ्हाणे मांडतोय, ती सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने समजून घेतली पाहिजे. विरोधी पक्ष हा सरकारचे कान आणि डोळे असतो. ही लोकशाहीतील परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यापासून चालत आलेली आहे. जे प्रशासन करू शकत नाही, ते विरोधी पक्ष करू शकतो. त्या विरोधी पक्षाने मांडलेल्या प्रश्नाकडे तुम्हाला गांभीर्याने पाहायचे नाही, ही लोकशाहीची या महाराष्ट्रात फडणवीस, मिंधे आणि पवारांनी केलेली शोकांतिका आहे. त्यामुळे आजचे आंदोलन महाराष्ट्राचे डोळे उघडणारे आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
एका बाजुला मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. सरकारने त्यांना जवळजवळ वाऱ्यावर सोडले आहे. तुमचे आणि त्यांचे काही विषयांवर मतभेद असू शकतात. त्यांच्या सगळ्याच मागण्या तुम्ही मान्य करू शकणार नाहीत. पण 13 दिवसांपासून एका मोठ्या समाजाचा नेता अन्न पाण्याचा त्याग करून हजारो समर्थकांसह तिथे बसला आहे आणि तुम्ही चर्चेचे दरवाजे बंद करून प्रशासनालाआदेश दिले की त्यांच्याकडे फिरकायचे नाही. हा अमानुषपणा, क्रौर्य आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
मराठवाड्यासह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं सुकली आहेत, करपून गेली आहेत. सोयाबीन, संत्र्यांच्या बागांवर शेतकरी नांगर फिरवत आहेत. फडणवीस सरकारने काय केले? केंद्राकडे बोट दाखवू नका, तिथेही तुमचेच सरकार आहे. ते रावण असतील तर तुम्ही कंस आहात. निवडणुका आल्या की 1000-1500 रुपयांच्या योजना जाहीर करून मते विकत घ्यायची आणि आमचे शेतकरी, त्यांच्या घरातील बायकाही त्यावेळी भुलून जातात आणि यांना मत देतात. आता त्याची किंमत महाराष्ट्र आणि शेतकरी वर्ग मोजतोय, असेही संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.