IPL 2027: चेन्नईच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाबाबत मोठी अपडेट! महेंद्रसिंग धोनीमुळे निर्णयाला होतोय उशीर?

काही दिसांपूर्वीच स्टीफन फ्लेमिंग (Stefan Fleming Former Head Coach of CSK) यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यापासून पाच वेळा आयपीएल विजेत्या सीएसकेचा संघ नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. मात्र, अजूनही संघाला मुख्य प्रशिक्षक मिळाला नाही.
चेन्नई फ्रँचायझीशी संबंधित अनेक मोठ्या चर्चा गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर सुरू आहेत. दरम्यान, सीएसकेशी संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. यासोबतच संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक निवडण्यास उशीर का होत आहे, याचं कारणही स्पष्ट झालं आहे.
रिपोर्ट्सनुसार,चेन्नई सुपर किंग्सच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाबाबत अंतिम निर्णय महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) घेणार आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad captain of CSK) आणि संघमालक एन. श्रीनिवासन यांची मुलगी रूपा गुरुनाथ यांचाही या महत्त्वाच्या निर्णयात सहभाग असेल.
सध्या महेंद्रसिंह धोनी अमेरिकेत आहे. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार, तो 22 सप्टेंबरला भारतात परतणार आहे. त्यानंतर लगेच चेन्नईमध्ये फ्रँचायझीची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्य प्रशिक्षकाबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
अशा परिस्थितीत सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस चेन्नई सुपर किंग्सच्या पुढील मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या फ्रँचायझी एका परदेशी खेळाडूसोबत मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेबाबत चर्चा करत आहे. मात्र, अंतिम निर्णय धोनी भारतात परतल्यानंतरच घेतला जाईल. तो परदेशी खेळाडू आणखी एका फ्रँचायझीसोबतही चर्चा करत आहे. मात्र, धोनीच्या सहभागानंतर हा खेळाडू सीएसकेशी जोडला जाऊ शकतो.
धोनी, ऋतुराज गायकवाड आणि संघमालक यांच्यात होणाऱ्या या बैठकीत ट्रेड होणाऱ्या खेळाडूंबाबतही चर्चा होणार आहे. नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा झाल्यानंतरच फ्रँचायझी संघात कायम ठेवण्यात येणाऱ्या आणि बाहेर करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी तयार करेल.
गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्समध्ये भागीदारी मागितल्याच्या चर्चा देखील सुरू होत्या. मात्र, आता या चर्चा चुकीच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीएसकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “महेंद्रसिंग धोनी यांनी याबाबत आमच्याशी कधीही चर्चा केलेली नाही. आम्हीही या मुद्द्यावर कधी चर्चा केलेली नाही. त्यांनी या विषयावर एन. श्रीनिवासन यांच्याशी चर्चा केली असल्याचीही आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.
मात्र, सध्या धोनीकडे चेन्नई सुपर किंग्सचे जवळपास 1 लाख शेअर्स आहेत. त्यांची सध्याची बाजारातील किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे. मात्र, सुपरस्टार खेळाडू म्हणून धोनीच्या स्थानाच्या तुलनेत ही रक्कम खूपच कमी आहे. चेन्नई सुपर किंग्सकडे 30 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सार्वजनिक शेअर्स आहेत. रिपोर्टनुसार, आता चेन्नई सुपर किंग्सची संपूर्ण जबाबदारी धोनीकडे सोपवण्यात आली आहे आणि पुढे तोच या संघाची धुरा सांभाळणार आहे.
Comments are closed.